Ambadas Danve : हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची दिलेली उमेदवारी रद्द करण्यात आल्यानंतर आणि यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळी यांची उमेदवारीचा पत्ता कट करण्यात आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली आहे. 


शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली


दानवे यांनी ट्विट करून आता कुठे जाणार गद्दारांनो? लोकसभा ट्रेलर असून विधानसभेत पूर्ण पिक्चर दिसेल अशा शब्दात तोफ डागली आहे. त्यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, शिवसेनेत, मातोश्रीवर सन्मान मिळत होता तो हेमंत पाटील यांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले आहेत. जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागावी, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी. असा दबाव उद्धवसाहेबांवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो? लोकसभा हा तर ट्रेलर आहे.. तुमचे दिल्लीश्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील. एक प्रकारे शिंदे गटामध्ये चाललेल्या घडामोडींवर दानवे यांनी ट्विट करत खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे.


दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दबावाल बळी न पडता उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. मात्र,0 आता जाहीर केलेल्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्याची वेळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आली आहे. हिंगोलीमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या दबावासमोर एकनाथ शिंदे यांना झुकावं लागलं असून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर करूनही पत्ता कट करण्यात आला आहे. याठिकाणी आता बाबुराव कदम कोहळीकर यांना संधी देण्यात आली आहे. 


हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार की नाही?


गेल्या काही दिवसांपासून उमेदवारीसाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठी घेऊन सुद्धा भावना गवळी यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे यवतमाळ वाशिम मतदारसंघातून हेमंत पाटील यांच्या पत्नी राज्यश्री पाटील यांना संधी देण्यात आली आहे. नाशिकमध्ये सुद्धा हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळणार की नाही? याबाबत खल सुरू आहे. हेमंत गोडसे यांचा नाशिक ते मुंबई असा प्रवास सुरूच आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत अजूनही संशयकल्लोळ सुरुच आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये धैर्यशील माने यांना उमेदवारी पहिल्या यादीमध्ये जाहीर झाली असली, तरी त्यांची उमेदवारी सुद्धा संकटात आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून त्यांना कडाडून विरोध सुरू आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेले चार खासदार अडचणी आले आहेत.


रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदान मतदार संघही सोडावा लागणार असल्याची सुद्धा चर्चा आहे. याठिकाणी भाजपने हा मतदारसंघ आपल्या पदरात पाडताना राणेंची उमेदवारी जवळपास निश्चित करण्यात आली आहे. याठिकाणी किरण सामंत यांनी माघार घेत असल्याचे माहिती दिली आहे. त्यामुळे तो मतदारसंघ शिंदे यांच्या हातून सुटला आहे. कल्याण आणि ठाणे या मतदारसंघावरूनही शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.


तर विधानसभेला काय होईल?


कल्याण हवा असेल तर ठाणे सोडा या मागणीवर भाजप अडून बसला आहे.कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेच खासदार असल्याने आता ते पहिल्या यादीमध्ये नाव आलं नव्हतं. त्यामुळे आता कल्याणचा मतदारसंघ त्यांना दिल्यास मग श्रीकांत शिंदे कुठून लढणार हा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. दुसरीकडे ठाणे द्यायचं ठरल्यास ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो, त्या जिल्ह्यातून ते आमदार सुद्धा आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार? हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. शिवसेना शिंदे गटावर भाजपकडून दबावाचं राजकारण सुरू असल्याची टीका आता नेत्यांमधूनच होऊ लागली आहे. पंजाब भाजप सर्व्हेच्या नावाखाली गंडवत असल्याची टीका होऊ लागली आहे. लोकसभेला अशा पद्धतीने स्थिती असेल तर विधानसभेला काय होईल? अशी भीती आता या पाठिंबा दिलेल्या आमदारांमध्ये व्यक्त होत आहे.