यवतमाळ : यवतमाळमध्ये लहान मुल विकण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे बालसंगोपनाचं काम करणाऱ्या बेटी फाऊंडेशनची अध्यक्ष बाळ विक्री करणाऱ्या टोळीची सूत्रधार असल्याचं स्टिंग ऑपरेशनद्वारे समोर आलं आहे. या प्रकरणात वणी पोलिसांनी 3 महिलांसह बालिकेच्या आई वडिलांनाही अटक केली आहे. जिल्ह्याच्या वणी येथील बेटी फाउंडेशनच्या अध्यक्ष यांनी 15 दिवसाची बालिका विकण्याचा घाट रचला होता त्याचा पर्दाफाश 36 तासात स्टिंग ऑपरेशनद्वारे महिला बालकल्याण समितीने उघड केला आहे 


वणी येथील एक 15 दिवसाचे बाळ दत्तक देण्याचा बहाणा करीत बाळ विक्रीचा घाट रचला, बाल कल्याण समिती व पोलिसांनी शिताफीने कारवाई करत मुलीची विक्री करणाऱ्या टोळीस अटक केली. वणी येथील बेटी फाऊंडेशन संस्थेने 15 दिवसाचे बाळ दत्तक देण्यास उपलब्ध आहे असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला होता. सदर संदेश अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी यांनी वाचल्यावर त्यांनी व्हायरल मेसेजची खात्री करण्यासाठी व्यूहरचना आखली. बाल कल्याण समितीने वणी येथील बेटी फाऊंडेशनला संपर्क साधून बाळाच्या विक्री बाबत विस्तृत माहिती संकलित केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत महिला व बालकल्याण आयुक्त यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर यवतमाळ व अकोला येथील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी स्टिंग ऑपरेशन करीत त्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.


यासाठी अकोला आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांच्या बाल संरक्षण यंत्रणांनी डमी पालक म्हणून बाळ दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू केली. यासाठी 3 लाख 50 हजारात बाळाचा सौदा करण्यात आला. बेटी फाऊंडेशनच्या सदस्यांनी बाळाच्या आई- वडिलांना 1 लाख 51 हजार रुपये देण्याचे कबुल केले होते तर उर्वरित रक्कम संस्थेचे पदाधिकारी वाटून घेणार होते. मात्र बाल कल्याण समिती व पोलिसांच्या कारवाईने बेटी फाउंडेशनचे पितळ उघडे पाडले आहे.


या प्रकरणी संबंधित 15 दिवसाच्या बलिकेचे आई- वडील आणि यात सहभागी बेटी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रीती दरेकर, कवडू दरेकर, गौरी बोरकुटे, मंगला राऊत आणि बालिकेचे आई वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.  


या लहान बलिकेचे आई वडील मजूरीचे काम करतात. त्यांना आधी 3 मुली आहेत आणि चौथी मुलगी 15 दिवसांपूर्वी झाली होती. त्याच बलिकेला विकण्याचा घाट बेटी फाउंडेशनने रचला होता. त्याचे पितळ या कारवाईमुळे उघड झाले आहे.  सदर बलिकेला वर्धा येथील शिशुबालगृहात पाठविण्यात आले आहे