Manoj Jarange Patil Health Update : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आमरण उपोषण आंदोलनाचा (Hunger Strike) आज सातवा दिवस आहे. उपोषणामुळे गुरुवारी जरांगेंची तब्येत खूप खालावली होती. जरांगे उपचार घेत नसल्याने राज्य सरकारने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगेंनी उपचार घेण्यास होकार दिला आहे. जरांगेनी गुरुवारी त्यांचे सहकारी आणि डॉक्टरांच्या विनंतीवरुन स्वतः वरील उपचारांना होकार दिला.


हायकोर्टाच्या आदेशानंतर जरांगेंकडून उपचार घेण्यास होकार


न्यायालयाच्या आदेशानुसार जालना जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांच्या देखरेखीखाली त्यांना सलाईन लावण्यात आलं. मनोज जरांगेंनी 10 फेब्रुवारीपासून उपोषण आंदोलन सुरु केलं होतं. पण गुरुवारी त्यांची तब्येत जास्त बिघडली. अशक्तपणामुळे जरांगेंना ग्लानी आली. जरांगेंना पाणीही घोटवत नव्हतं. एवढं असतानाही जरांगे उपचार आणि पाणी घेण्यास मनाई करत होते, त्यामुळे राज्य सरकारने कोर्टात तक्रार दिली. यानंतर न्यायालयाने जरांगेंना उपचार घेण्याचे आदेश दिले.


सकल मराठा समाजाकडून आज चक्काजाम


मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून आज चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. नांदेड-हिंगोली, परभणीसह विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा म्हणून परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन सुरू झालं आहे तसेच जेलभरो आंदोलनही करण्यात येणार आहेत.


ठिकठिकाणीची वाहतूक मात्र ठप्प


परभणी जिल्ह्यातील गंगाखेड नांदेड महामार्गावरील मर्डसगाव तसेच गंगाखेड राणीसावरगाव या दोन्ही महामार्गावर मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले आहे. परभणी नांदेड महामार्गावरील लिमला पाटीवर ही बैलगाड्या आणुन चक्का जाम केला जातोय. परभणी शहरातील विसावा कॉनरवर ही मराठा बांधव चक्का जाम करून बसले आहेत. सेलू जिंतूर तालुक्यामध्ये जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहेत. आज मराठा समाजाने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे ठिकठिकाणीची वाहतूक मात्र ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे.


उपोषण मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती 


मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यात आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु असून आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आमरण उपोषण आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. मराठा आरक्षण आंदोलकांनी आता या गोष्टी सकारात्मक दृष्टीनं घ्याव्यात, जरांगेंनी आंदोलन मागे घ्यावं, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगेंना केलं आहे. मराठा आरक्षण देताना इतर कुणावरही अन्याय झालेला नाही, तो होऊ देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


CM Eknath Shinde : जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती