Baba Adhav passes away : सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते, गांधीवादी समाजसेवक, असंघटित मजुरांच्या हक्कासाठी लढणारे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांचे आज निधन (Baba Adhav passes away) झालं. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक यासह सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी लढणारे मौलिक व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेल्याचे दु:ख होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर प्रस्थापित व्यवस्थेच्या रोषाची तमा न बाळगणारे सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक डॉ. बाबा आढाव यांची उणीव सदैव भासत राहील, अशा शब्दात जेष्ठ नेते शरद पवार यांनी बाबा आढावांना श्रद्धांजली अर्पण केली.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. वंचित आणि असंघटित घटकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यांचे आधारस्तंभ म्हणून काम केले. हमाल, रिक्षाचालक, बांधकाम मजुरांना न्याय देण्यासाठी त्यांनी संघटन उभे केले. हमाल पंचायत, एक गाव-एक पाणवठा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. सामाजिक कुप्रथांविरोधात त्यांनी दिलेला लढा हा कायम स्मरणात राहील. महाराष्ट्राला समाजसेवकांची एक थोर परंपरा कायमच लाभली. त्या परंपरेतील एक मौलिक व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेले. ते कायम स्मरणात राहतील, त्यांचे विचार येणार्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक असलेल्या बाबा आढाव यांची उणीव सदैव भासत राहील : शरद पवार
आपल्या महाराष्ट्रात प्रागतिक ,कृतीशील विचार मांडून ते आचरणात आणणाऱ्या शिलेदारांची एक मोठी फळी आहे. भूमिका घेताना परिणामांची, प्रस्थापित व्यवस्थेच्या रोषाची तमा न बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक, पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक डॉ. बाबा आढाव ह्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. आज जेव्हा त्यांच्या निधनाचं वृत्त समजलं तेव्हा त्यांचा संघर्षाचा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा सारा पट डोळ्यासमोरून गेला. 'एकाकी मजदूर' चळवळ, कामगारांच्या हक्कांसाठीची त्यांची अखंड झुंज, समतेवर आधारित समाजरचनेचा त्यांचा ठाम निर्धार अशा सर्व भूमिकांमधून ते सतत प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत राहिले. आजच्या सामाजिक दृष्ट्या अस्थिर, विषमतेने, विद्वेषाने ग्रासलेल्या काळात बाबा आढाव ह्यांच्यासारख्या निडर, विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या विभूतींची उणीव सदैव भासत राहील. बाबा आढाव ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आढाव कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला : उपमुख्यमंत्री अजित पवार
समाजकारणातील निस्पृहता, तळमळ आणि अत्युच्च प्रामाणिकतेचे प्रतीक असलेले ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. श्रमिक, कष्टकरी, दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अहोरात्र झटणारा महान संघर्षयोद्धा आज हरपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कागद-काचा वेचणाऱ्यांची संघटना अशा विविध संघटनांद्वारे लाखो कष्टकऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करण्याचे कार्य बाबा आढाव यांनी केले. ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ त्यांनी उभी केली. सत्यशोधक चळवळीचा विचार आपल्या कृतीतून त्यांनी आयुष्यभर जपला. समाजातील सर्वात तळातील घटकाला न्याय मिळवून देणे, हाच त्यांचा ध्यास होता. संघर्षमय जीवन जगत त्यांनी प्रत्यक्ष कामातून समाजवादाची मूर्त प्रतिमा उभी केली. त्यांचा आशावाद, परखड विचार, निस्वार्थी वृत्ती आणि जनतेशी असलेली नाळ हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचे मोठे बळ होते. बाबा आढाव यांचे कार्य म्हणजे समाजहितासाठीचे निर्भीड आणि ज्वलंत आयुष्य कसे असावे, याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रगत, विचारशील चळवळीचे अपरिमित नुकसान झाले असून महाराष्ट्राने समाजसेवेचा महान तपस्वी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा आढाव यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.
बाबा, माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते : सुप्रिया सुळे
आदरणीय डॉ. बाबा आढाव यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. बाबा, माझ्यासह अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते. त्यांनी शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा, सत्यशोधकी विचारांचा मार्ग अधिक प्रशस्त केला. या विचारांची शिदोरी बाबांनी आम्हा सर्वांच्या ओंजळीत भरभरुन टाकली. ते अखेरच्या क्षणापर्यंत अगदी आजारपणातही जनतेच्या हितासाठी विशेषतः हमाल, रिक्षाचालक, कामगार, कष्टकरी आणि वंचित समूहाच्या उत्थानासाठी कार्यरत होते. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन संघर्ष करीत होते. या सर्वांसाठी बाबा आढाव हे मोठा आधार होते. त्यांच्या जाण्यामुळे आज सामाजिक चळवळींच्या अवकाशात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने देश एका वैचारीक, सत्वशील, व्रतस्थ आणि अखंड सेवाव्रती नेतृत्वाला मुकला. या कठीण प्रसंगात आम्ही सर्वजण आढाव कुटुंबियांसोबत आहोत. बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली.