IndiGo Airlines News :  गेल्या काही दिवसांत इंडिगो एअरलाइन्सच्या (IndiGo Airlines)  नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कंपनीने काल मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली होती. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. या विरोधात प्रवाशांनी संताप देखील व्यक्त केला होता. दरम्यान, इंडिगोची विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, गेल्या सहा दिवसात इंडिगो एअरलाइन्सला 37 हजार कोटी रुपयांचा फटका बसला आहे. कंपनीच्या शेअर्समध्येही मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

सध्या इंडिगो मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करत आहे. हजारो उड्डाणे रद्द झाली आहेत आणि त्यांच्या स्टॉकमध्ये 16 टक्के घट झाली आहे. वाढत्या किमती, कमकुवत होत चाललेला रुपया आणि वैमानिकांच्या कमतरतेमुळे ब्रोकरेजना त्यांच्या लक्ष्यित किंमती कमी कराव्या लागल्या आहेत. ज्या प्रकारे उड्डाणे सतत रद्द केली जात आहेत आणि शेअर्स घसरत आहेत, त्यामुळे इंडिगोचे पुढ काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

सलग सातव्या दिवशी एअरलाइनला तोटा सहन करावा लागला

इंडिगोची मूळ कंपनी, इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडच्या शेअर्समध्ये सोमवारीही घसरण सुरूच राहिली, ती 10 टक्क्यांवर घसरुन 4842 रुपयांवर आली आहे. सलग सातव्या दिवशी एअरलाइनला तोटा सहन करावा लागला. देशातील हवाई प्रवासात झालेल्या गंभीर व्यत्ययाच्या परिणामांवर गुंतवणूकदारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असता, सहा दिवसांत या शेअरमध्ये 16.4 टक्के घसरण झाली आहे, ज्यामुळे त्याचे बाजारमूल्य 37000 कोटींपेक्षा जास्त घसरले आहे.

Continues below advertisement

 बदललेल्या नियमांमुळे एअरलाइनच्या क्रू वेळापत्रकात अडथळा

इंडिगोला मोठ्या प्रमाणात कामकाजात अडथळे येत आहेत. बदललेल्या नियमांमुळे एअरलाइनच्या क्रू वेळापत्रकात अडथळा निर्माण झाला, ज्यामुळे पायलटची मोठी कमतरता निर्माण झाली आणि सेवा जवळजवळ थांबल्या. या संकटामुळे शुक्रवारीच 1000 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. जी इंडिगोच्या दैनंदिन कामकाजाच्या जवळपास निम्म्या होत्या. यामुळे देशभरातील विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले.

यूबीएसने इंटरग्लोब एव्हिएशनवर खरेदी रेटिंग कायम ठेवले परंतु बदललेल्या नियमांसाठी एअरलाइनच्या तयारीचा अभाव असल्याचे कारण देत त्याची लक्ष्य किंमत 6350 पर्यंत कमी केली. ज्यामुळं लक्षणीय ऑपरेशनल आव्हाने निर्माण होतात. बदललेल्या नियमांचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त क्रू आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या कमकुवतपणामुळे वाढलेल्या खर्चाची भरपाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ब्रोकरेजने त्यांचे आर्थिक वर्ष 2026 आणि आर्थिक वर्ष 2028 च्या खर्चाचे अंदाज वाढवले ​​आहेत. अल्पकालीन अडचणी असूनही, इंडिगोची दीर्घकालीन वाढ मजबूत राहील असा विश्वास यूबीएसला आहे. आंतरराष्ट्रीय विस्तारामुळे इंडिगोला नैसर्गिक मदत आणि मार्जिन स्थिरता मिळेल.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांना भारतातील हजारो प्रवाशांना होणाऱ्या गंभीर उड्डाण व्यत्ययांबाबत कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्यासाठी आणखी 24 तासांचा वेळ दिला आहे. नियमांनुसार कारवाई का केली जाऊ नये हे नियामकाने एल्बर्सना 24 तासांच्या आत स्पष्ट करण्यास सांगितले आहे.