औरंगाबाद : महाराष्ट्रात विकासाच्या कितीही बाता होत असल्या तरी, प्राथमिक सुविधा सुद्धा देण्यात मागं असल्याचं चित्र पैठणमध्ये दिसतं. केवळ स्वच्छतागृह नाही म्हणून एका विद्यार्थिनीनं बीएडचं शिक्षण सोडलं आहे.


एका भावी शिक्षिकेला महाविद्यालयात महिला स्वच्छतागृह नाही, म्हणून शिक्षणच सोडावं लागलं आहे. पैठण तालुक्यातील आखदवाड्यातल्या कविता छडीदार यांनी लहान मूल असताना शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. डीएडसाठी पैठणच्या शासकीय अध्यापक महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र मुलं आणि मुलींसाठी एकत्र स्वच्छतागृह असल्यानं कविता यांना महाविद्यालय नकोसं वाटू लागलं.

कविता यांच्याबरोबर त्यांच्या पतीनंही यासाठी लढा दिला. पण साधं आश्वासनंही मिळालं नाही. खूप पत्रं लिहिली पण काही झालं नाही. त्यानंतर टीसी मागितली, असं त्या सांगतात. मात्र प्राचार्यांना कविता यांचे आरोप मान्य नाहीत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र
स्वच्छतागृह असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आता महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी शाळेतल्या मुलींच्या स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी प्रशासनाला कामाला लावलं आहे. मात्र सरकारी महाविद्यालयांमध्येही परिस्थिती वेगळी नाही. त्यामुळे आता राज्य सरकार पुढाकार घेऊन इतर विद्यार्थिनींचं शिक्षण सुकर करणार का? हा महत्वाचा प्रश्न आहे.