पंढरपूर : महाराष्ट्राला तालमीतील लाल मातीची रांगडी परंपरा आहे. म्हणूनच रामायण महाभारतापासून कुस्तीचा मर्दानी खेळ शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राची ओळख बनला आहे. या कुस्तीचं वेड नुसतं मोठ्यांनाच नाही, तर नऊ वर्षांच्या चिमुरड्यालाही आहे. पंढरपुरातील आझादची शाळेतील मुलांसोबत कुस्तीची क्लिप व्हायरल झाली आहे.
समोर येईल त्याला एकापाठोपाठ एक कुस्तीचे वेगवेगळे डाव वापरत आझाद बाळगोपाळांना अस्मान दाखवत होता. प्रत्येक विजयानंतर हातावर उडी मारुन आपल्या वस्तादाचं नाव घेत आरोळी ठोकत होता. ही क्लिप त्याच्याच शिक्षकाने व्हायरल केली आणि पाहता पाहता महाराष्ट्रभर फिरु लागली. याच आझादला भेटायला 'एबीपी माझा' त्याच्या पंढरपुरातील अक्षरनंदन प्राथमिक शाळेत गेला, तर हा बाल पैलवान शाळेत परीक्षा देण्यात मग्न होता.
नऊ वर्षांच्या आझादला कुस्तीमधील 27 प्रकारचे डाव अवगत आहेत. त्याचे कुस्तीमधील वेड पाहून काही महिन्यांपूर्वी वडिलांनी त्याला घराशेजारील तालमीत पाठवलं. एवढ्या लहान वयात त्याला असलेलं कुस्तीचं वेड पाहून त्याला शिकवणारे वस्ताद औदुंबर शिंदेही चाट पडले आहेत. आझाद नक्की राष्ट्रीय स्तरावरचे मेडल जिंकेल, असा विश्वास आता शिंदे व्यक्त करत आहेत.
शाळेतील अभ्यासात तितकाच हुशार असणारा आझाद पहाटेपासून तालमीत नियमित 50 जोर, 50 बैठकांसह सर्व प्रकारचे व्यायाम नियमित करतो आणि मगच लाल मातीत कुस्त्यासाठी उतरतो. एवढ्या लहान वयात हे सर्व 27 प्रकारचे कुस्तीमधील डाव तो नुसते वापरतच नाही तर आपल्यापेक्षा मोठ्या मुलांनाही योग्यवेळी हे डाव वापरुन तो अस्मान दाखवतो.
आझादचं लक्ष सध्या तरी अभ्यास आणि कुस्ती या दोन्ही गोष्टींकडे आहे, पण त्याच्या मनात इच्छा आहे ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल जिंकण्याची. त्याला आपलं ध्येय साध्य करण्यासाठी शुभेच्छा.
कुस्तीचे 27 डाव वापरुन प्रतिस्पर्ध्याला अस्मान दाखवणारा आझाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Oct 2018 11:50 PM (IST)
शाळेतील अभ्यासात तितकाच हुशार असणारा आझाद पहाटेपासून तालमीत नियमित 50 जोर, 50 बैठकांसह सर्व प्रकारचे व्यायाम नियमित करतो आणि मगच लाल मातीत कुस्त्यासाठी उतरतो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -