मुंबई : बेकायदा होर्डिंगमुळे शहरं विद्रुप झाली आहेत. विविध राजकीय पक्षांची ही अनधिकृत होर्डिंग असल्याचं वारंवार उघडकीस आलं आहे. मात्र या बेकायदा होर्डिंगबाजीत भाजप आणि शिवसेना हे सत्ताधारी पक्षच आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे.


हायकोर्टाच्या निर्देशांनुसार राज्यातील पालिका प्रशासनांकडून आलेली माहिती याचिकाकर्त्यांनी एकत्र करुन कोर्टापुढे सादर केली. या आकडेवारीनुसार राज्यभरात शिवसेनेची 47 तर, भारतीय जनता पक्षाची 41 बेकायदा होर्डींग आढळून आली आहेत. यातही मुंबई आणि अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक मोठी बेकायदा होर्डिंग असल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात दिली.

राज्यातील बेकायदा होर्डिंगबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुस्वराज्य फाऊंडेशन तसेच भगवानजी रयानी यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम एस सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.

या होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश वारंवार कोर्टाने देऊनही अनेक राजकिय पक्षांनी ही होर्डिंग काढलेली नाहीत. त्यामुळे कोर्टाच्या आदेशाचा अवमान करुन होर्डिंग लावणाऱ्या राजकीय पक्षांची नावे द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांना दिले होते. त्यानुसार राज्यातील बेकायदा होर्डिंगची आणि पक्षांची ही माहिती समोर आली. न्यायालयाने हे प्रतिज्ञापत्र सादर करुन घेत याबाबतची सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली.