नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोलीमध्ये तीन रिक्षा चालकांनी एनएमएमटीच्या ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घणसोली सेक्टर 5 मध्ये हावरे चौकात हा प्रकार घडला आहे.

रस्त्यावर रिक्षा उभ्या केल्या असल्याने बस जाण्यास अडचण निर्माण झाली होती. यामुळे एनएमएमटीच्या बस ड्रायव्हरने हॉर्न वाजवून रिक्षा बाजूला घेण्याची विनंती केली होती. मात्र, यानंतर रिक्षा चालकांनी बस ड्रायव्हर बरोबर हुज्जत घालायला सुरवात केली.

बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना खाली बोलवत शिवीगाळ केली. दोन रिक्षा चालकांनी तर बस ड्रायव्हरला बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला आहे. मारहाण करणारे रिक्षाचालक हे घणसोलीचे आहेत.

navi mumbai marhan


कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तीन रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे. राजेश मारूती वाशीवाले आणि दादासो घुडेकर या दोन रिक्षाल्यांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे.

आरोपींनी बस ड्रायव्हर यांच्या कानशिलात लावताना, विट फेकून मारली आहे. त्याच बरोबर सायकल उचलून डोक्यात घातली आहे. सर्व प्रकार मोबाईलमध्ये शूट झाला असल्याने आरोपी विरोधात कारवाई करण्यास पोलिसांना मदत झाली आहे.