औरंगाबाद : औरंगाबाद दंगलीप्रकरणी शिवसेनेचा कार्यकर्ता लच्छू पैलवानला अटक करण्यात आली आहे. दंगल भडकवणे, जाळपोळ करणे या आरोपांखाली लच्छू पैलवानला सिटी चौक पोलिसांनी काल रात्री अटक केली.
लच्छू पैलवानचं खरं नाव लक्ष्मीनारायण बखरिया आहे. परंतु तो लच्छू पैलवानाच्याच नावाने ओळखला जाता. कलम 143, 144, 436 जाळपोळ, दंगल तसंच 4, 25 भारतीय हत्यार कायदा, 135 महाराष्ट्र पोलिस कायदा या गुन्ह्यांतर्गत लच्छू पैलवानला अटक केली आहे.
याआधी एमआयएम आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाला अटक करण्यात आली होती.
दंगल नियंत्रणात आली का? शुद्धीवर येताच पोलीस अधिकाऱ्याचा पहिला प्रश्न
काय आहे प्रकरण?
औरंगाबादमधील मोतीकारंजा परिसरात 11 मे रोजी किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली आहेत. या घटनेत आतापर्यंत 30 ते 40 जण जखमी झाले आहेत. तर यात दोघांचा मृत्यू झाला होता.
औरंगाबाद पेटण्यामागचं नेमकं कारण काय?
औरंगाबाद का धुमसलं यामागे प्रत्येकाकडून वेगवेगळं कारण सांगितलं जात आहे. प्रत्येकाने वेगवेगळा दावा केला आहे.
या दंगलीचं पहिलं कारण हे शहागंज भागातून समोर येतंय. सरदार वल्लभभाईंचा पुतळा आणि या ऐतिहासिक पुतळ्याच्या नुतनीकरणासाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पण त्यासाठी इथे असलेल्या पानाच्या टपऱ्या हलवण्याची आवश्यकता होती. तसे आदेशही निघाले आणि यावरुनच वादाला तोंड फुटलं आणि त्याला धार्मिक रंग मिळाला, असाही दावा आहे.
शहागंज भागातल्या बाजारपेठेत काही हातगाडीवाले हे व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर गाड्या लावतात. त्यामुळे दुकानदारांचा त्यांचावर रोष होता. दुकानदारांनी स्थानिक नगरसेवक लच्छू पहिलवान यांच्याकडे दादही मागितली होती. त्यानुसार लच्छू पहिलवान यांनी या फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी पालिकेकडे केली. याच वादातून ही जाळपोळ झाल्याचा दावा केला जात आहे.
महापालिकेच्या पाण्याच्या कनेक्शनवरुन मोतीकारंजा भागात दोन गटात हाणामारी झाली. त्याच हाणामारीने उग्र रुप धारण केलं आणि मग भडका उडाला, असाही काहींचा दावा आहे.
चौथी थिअरी तर भयंकर आहे. काही दिवसांपूर्वी शहागंज भागात एका व्यक्तीने आंबे खरेदी केले. त्यातले अनेक आंबे खराब निघाले. तेच आंबे बदलून घेण्यासाठी तो विक्रेत्याकडे गेला. विक्रेत्याशी त्याची बाचाबाची झाली आणि त्याच फळांच्या गाड्या हटवण्याची मागणी सुरु झाली आणि त्यातूनच दंगल उसळली, असंही सांगितलं जातंय.
आता त्यात आणखी एका थिअरीची भर घातली ती शिवसेनेने. औरंगाबादमधल्या एका दंगलग्रस्त भागात एका महिलेची छेड काढण्यात आली. त्यावरुन वादाला तोंड फुटलं आणि दोन समुदायाचे लोक एकमेकांवर धावून गेले, असा दावा करण्यात आला.
दंगल झाल्यानंतर अफवा पसरवू नका असं खुद्द सरकार आणि पोलीस सांगतात. पण औरंगाबादमधल्या या जाळपोळीमागे वेगवेगळी कारणं सांगून हवा नेमकी कोण देतंय, हा मोठा प्रश्न आहे.
संबंधित बातम्या :
औरंगाबादमध्ये दोन गट भिडले, घरं आणि दुकांनांचं नुकसान
औरंगाबाद का धुमसलं? जाळपोळीची कारणं काय?