अंबाजोगाई : जलसंधारणाची चळवळ गावोगावी आता गतीमान होवू लागली आहे. बुधवारी सकाळी हातोल्यात झालेल्या महाश्रमादानात ग्रामस्थांसह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे दीड हजार लोक श्रमदानात सहभागी झाले. एकाच दिवसात श्रमदानाच्या माध्यमातून दोन हजार घनमिटरचे खोदकाम श्रमदानातून झाले. आज हातोल्यात मुख्यमंत्री ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानची टीम दाखल झाली व या टीमने या गावात झालेल्या विविध कामांची पाहणी केली. हातोला येथील ग्रामस्थांनी गावचे सरपंच अॅड. जयसिंग चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त महाश्रमदानाचा उपक्रम राबविला. यावेळी महाश्रमदानाच्या ठिकाणीच केक कापून अॅड. जयसिंग चव्हाण यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
अंबाजोगाई तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत हातोला हे गाव सहभागी झाले आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासून हातोला गावात जलसंधारणाच्या कामांना मोठ्या प्रमाणात गती मिळाली आहे. गेल्या 40 दिवसात दोनवेळा महाश्रमदान इथे झाले बुधवारी झालेल्या महाश्रमदानाला अंबाजोगाई तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थांसह दिड हजार महिला व पुरूष श्रमदानात सक्रिय होते. यावेळी दोन हजार घनमिटरचे खोदकाम श्रमदानातून झाले. एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात श्रमदानातून काम होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानची टीम हातोल्यात
हातोला गावाची वाटचाल आदर्श गावाकडे होत असल्याने व वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेली क्रांती याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानच्या टीमने हातोला येथील विविध कामांची पाहणी केली. या समितीने श्रमदान करुन आपला सहभाग नोंदविला.
51 हजार रोख व पाचशे लिटर डिझेलची मदत
हातोला येथे आज झालेल्या महाश्रमदानाच्या वेळी आलेल्या विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी गावात सुरु असलेल्या कामासाठी मदत केली. यावेळी रघुवीर देशमुख यांनी 25 हजार रूपये तर राजकिशोर मोदी यांच्याकडून 300 लिटर डिझेल, मनोज लोढा 200 लिटर डिझेलची मदत करण्यात आली.