मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे खंदे समर्थक शिशीर शिंदे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिशीर शिंदेंनी गेल्यच आठवड्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, पुढील राजकीय वाटचालीबाबत प्रदीर्घ चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


मुंबई महापालिका निवडणुकीवेळी रणनीतींपासून दूर ठेवल्याने शिशीर शिंदे पक्षावर नाराज होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरेंना पत्र लिहून, मनसेच्या नेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा, अशी विनंती केली होती.

गेल्या काही दिवसांपासून शिशीर शिंदे हे मनसेच्या विभागवार बैठका आणि कार्यक्रमांपासून दूर राहत होते.

कोण आहेत शिशीर शिंदे?

शिशीर शिंदे हे मनसेचे विद्यमान सरचिटणीस आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे जे 13 आमदार निवडून आले होते, त्यामध्ये भांडुपमधून शिशीर शिंदे विजयी झाले होते. अत्यंत धाडाडीचे नेते आणि डॅशिंग आमदार म्हणून ते कायमच परिचित राहिले आहेत.

शिशीर शिंदेंची राजकीय कार्यकीर्द :

- 64 वर्षीय शिशीर शिंदे यांनी आपली राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरु केली.
- 1992 साली ते शिवसेनेचे मुलुंडचे नगरसेवक होते.
- शिवसेनेने त्यांना उपनेतेपद दिलं होते
- शिवसेनेची अनेक आंदोलनं त्यांनी गाजवलं.
- बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली होती.
- शिशीर शिंदेंनी 1991 मध्ये वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली होती.
- 1996 ते 2002 या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य होते.
- त्यांनी 2006 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत, राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला.
- मनसेकडून त्यांनी 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती, मात्र तिथे त्यांचा पराभव झाला.
- त्याच वर्षी शिशीर शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला होता. मात्र विधानसभा सभागृहात शपथघेण्यापूर्वीच त्यांना मुंबई आणि नागपूर विधानसभेतून चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं.
- सपा आमदार अबू आझमी यांच्या हिंदीतील शपथेला विरोध करत, त्यांच्यावर मनसे आमदारांनी सभागृहातच हल्ला केला होता. या प्रकरणात शिशीर शिंदे निलंबित झाले होते. मात्र 2009 मध्ये त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली.

आतापर्यंत कुठल्या नेत्यांचा मनसेला राम राम?

नाशिकमधील वसंत गिते, मुंबईमधील राम कदम आणि प्रवीण दरेकर यांसारखे बडे नेते मनसेतून आतापर्यंत बाहेर पडले आहेत. त्यानंतर आता शिशीर शिंदे हे सुद्धा बाहेर पडण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चा सुरु आहेत.