औरंगाबाद: भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांचा अत्यंत जवळचा असल्याचे सांगत अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या गणेश बोरसे या ठकसेनाला अखेर औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे.
रावसाहेब दानवे यांना या प्रकरणाची कुणकुण लागताच त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. तसेच गणेश बोरसेला पकडण्यासाठी खुद्द दानवेंनीच सापळा रचला आणि एका लग्न समारंभात पकडून त्यांनी गणेशला पोलिसांच्या ताब्यात दिलं.
गणेश बोरसेनं फक्त पैसैच वसूल केले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या नावाचं लेटरहेड तयार करुन अनेकांना बनावट ऑर्डरही वितरीत केल्या. बदली करुन देणे, अडकलेले सरकारी काम करुन देणे, सरकारी नियुक्ती करून देणे. ही काम करून देतो असं सांगत गणेशनं अनेकांकडून पैसै उकळले होते. अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना देखील त्यानं गंडवलं होतं.
अनेकांकडून पैसे उकळून त्यानं आतापर्यंत कोट्यवधी रुपये जमावल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यासोबत इतरही काही साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दरम्यान, यावेळी तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. याआधी गणेश बोरसेवर बनावट नोटा छापण्याचा गुन्हाही दाखल आहे.