औरंगाबाद : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उद्या (शनिवारी) नियोजित सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर स्टेज उभारण्यास मंजुरी नसल्यामुळे औरंगाबाद महापालिकेचं ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी राष्ट्रवादीची धावपळ सुरु आहे.
राष्ट्रवादीने मराठवाड्यात आयोजित केलेल्या हल्लाबोल यात्रेची सांगता उद्या औरंगाबादेत होणार आहे. मोर्चाला परवानगी असली तरी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाच्या रस्त्यावर सभा घेता येणार नाही. यावेळी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतर नेते मंचावर उपस्थित राहतील.
हल्लाबोल यात्रेचा दुसरा टप्पा मराठावाड्यातील सर्व जिल्ह्यात झाला. शनिवारी सकाळी 11 वाजता क्रांतीचौक ते मराठवाडा विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढण्यात येईल. आयुक्तांना निवेदन दिल्यानंतर दुपारी दोन वाजता भव्य सभा घेऊन दुसऱ्या टप्प्याची सांगता केली जाईल.
मोर्चा आणि सभेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह पक्षाचे मराठवाड्यातील सर्व आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.