नवी दिल्ली : कांद्याच्या दराच्या घसरणीवर केंद्र सरकारने उपाय शोधला आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातमूल्य पूर्णपणे हटवल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


कांद्यावर 700 डॉलर्स प्रति टन इतकं किमान निर्यात मूल्य लावण्यात आलं होतं. त्यामुळे कांद्याची निर्यात अशक्य झाली होती. दर घसरणीनंतर अखेर कांदा निर्यात खुली करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.

या काळात देशांतर्गत बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली होता. सर्वात मोठ्या लासलगाव बाजारपेठेत इतर राज्यातील आवक वाढल्यामुळे कांदा 900 रुपयांनी कोसळला होता. त्यामुळे निर्यात मूल्य हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता.

आता निर्यात खुली झाल्यामुळे कांद्याचे दर स्थिर व्हायला मदत होणार आहे. भारत सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश आहे.
बांग्लादेश, मलेशिया, श्रीलंका, यूएई या देशातून मोठ्या प्रमाणावर आपला कांदा आयात केला जातो. किमान निर्यात मूल्य हटवल्याचा त्या देशांनाही फायदा होईल.