औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली आहे. औरंगाबाद पैठण रस्त्यावरील चितेगाव टोल नाक्याजवळ ही जलवाहिनी फुटली आहे. औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान याचवेळी पोकलेनचा धक्का लागल्याने ही जलवाहिनी फुटली असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे जलवाहिनी फुटल्यावर तब्बल 100 ते 150 फुटांपर्यंत उंच असे पाण्याचे फवारे उडताना पाहायला मिळाले. त्यामुळे लाखो लिटर पाणी अक्षरशः रस्त्यावर वाया गेले आहे. तर दुसरीकडे याचा फटका औरंगाबाद शहराला बसण्याची शक्यता असून, पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचा अंदाज आहे. 


मागील काही दिवसापासून औरंगाबाद पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी जेसीबी आणि पोकलेन वापरले जात आहे. दरम्यान, आज (4 सप्टेंबर) रोजी रस्त्याचे काम सुरू असताना, एका पोकलेनचा धक्का औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला लागला. त्यामुळे ही जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यावर मोठ्या प्रमाणातून त्यातून पाणी उडताना पाहायला मिळालं. या पाण्याचा वेग एवढा होता की, अक्षरशः 100 ते 150 फूट उंच पाण्याचे फवारे उडत होते. त्यामुळे तासाभरात लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेलं. हवेत उडणारे पाण्याचे फवारे बंद करण्यासाठी पोकलेनची बकेट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण पाण्याचा वेग अधिक असल्याने पोकलेन देखील काहीच करू शकले नाही. शेवटी याची माहिती महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाला देण्यात आली. त्यानंतर फारोळा जलशुद्धी केंद्रातून पाणी बंद करण्यात आले . वरून पाणी बंद झाल्यानंतर फुटलेल्या जलवाहिनीतील पाण्याचा वेग देखील कमी झाला. 


महानगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी


औरंगाबाद पैठण रस्त्यावरील चितेगाव टोलनाक्यावर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. जेसीबीच्या मदतीने जलवाहिनी मोकळी करण्याचे  काम सुरु आहे. तसेच जलवाहिनी दुरुस्तीचे काम देखील हाती घेण्यात येणार आहे. मात्र, या दुरुस्तीसाठी किती वेळ लागेल याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून मिळू शकली नाही. 


शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत?


मागील काही दिवसात औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणारी पाणीपुरवठा योजना सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने खंडित होत आहे. कधी पाईपलाईन फुटते, कधी सबस्टेशनमध्ये अचानक स्पार्किंग होते, तर कधी पंपगृहात शॉर्टसर्किट होतो. विशेष म्हणजे औरंगाबाद शहराला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या 1200 आणि 700 मिमीच्या जलवाहिन्या जुन्या झाल्याने सतत फुटत आहे. या सर्व कारणांमुळे औरंगाबाद शहरवासीयांना सतत पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय. भर पावसाळ्यात नागरिकांना सहा ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


जालना घटनेच्या निषेधार्थ आज औरंगाबाद जिल्ह्यात बंदची हाक; MIM सह अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा