Aurangabad Crime News : स्वतःला दुर्लभ कश्यप गँगचे (Durlabh Kashyap Gangster) भाई असल्याचे भासवत परिसरात गुंडगिरी करणाऱ्या टोळक्याची औरंगाबाद (Aurangabad) शहरात गेल्या काही दिवसांपासून दहशत पाहायला मिळत आहे. खास करुन पुंडलिकनगर परिसरात या गुंडांची प्रचंड दहशत आहे. त्यामुळे या गुडांची भाईगिरी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी (Police) प्रयत्न सुरु केले आहेत. या टोळक्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी सर्व आरोपींची पुंडलिकनगर परिसरातूनच धिंड काढत स्थळ पंचनामा केला. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या या भूमिकेचं स्वागत केले आहे. 


क्षुल्लक कारणावरुन जेसीबी चालकावर टोळक्याने चाकूने वार करुन त्याला गंभीर जखमी केल्याची घटना 17 जुलै रोजी पुंडलिकनगर परिसरातील मेहरसिंग नाईक कॉलेजसमोर घडली होती. या प्रकरणी एका टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली होती. तर या टोळक्यांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी सर्व आरोपींची पुंडलिकनगर परिसरातूनच धिंड काढत स्थळ पंचनामा केला. पुंडलिकनगर भागात गेल्या काही दिवसांपासून छोट्या-छोट्या टोळ्या तयार झाल्या असून, त्यांच्यातील टोळी युद्ध पाहता परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे हे गुंड स्वतःला दुर्लभ कश्यप गँगचे भाई असल्याचे भासवत त्याप्रमाणे वेशभूषा करुन परिसरात वावरताना पाहायला मिळतात. तर नुकतेच या टोळक्याने क्षुल्लक कारणावरुन जेसीबी चालक राजू पठाडे याच्यावर जीवघेणा चाकू हल्ला करुन गंभीररित्या जखमी केले होते.


आरोपींना बेड्या घालून परिसरातून फिरवण्यात आले


जेसीबी चालकावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी आकाश बनपुरे (वय 27 वर्षे, रा. आनंदनगर, गारखेडा), प्रेम सपाटे (वय 22 वर्षे, रा. आनंदनगर), सुरज खंडागळे (वय 30 वर्षे, आनंदनगर), अमोल वाघमारे (वय 32 वर्षे, आनंदनगर), शुभम त्रिभूवन (वय 29 वर्षे, भारतनगर) या पाच जणांना 20 जुलै अटक केली होती. तर न्यायालयाने या पाचही जणांना 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान घटनेचा स्थळ पंचनामा करण्यासाठी आणि गुन्ह्यात वापलेले शस्त्र जप्त करण्यासाठी पाचही आरोपींना शनिवारी पोलिसांकडून कोठडीबाहेर काढण्यात आले. तसेच या गुंड टोळीची परिसरातील दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावरुन धिंड काढली. सर्वांना बेड्या ठोकून परिसरातून फिरविण्यात आले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करत आरोपींच्या माहितीवरुन गुन्ह्यात वापरलेले दोन चाकू जप्त केले. बेड्यांमधील गुंडांना पाहण्यासाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


आई-वडील लग्न करुन देत नसल्याने 'तो' चोरु लागला महिलांची अंतर्वस्त्रे; तरुणाचे कारनामे सीसीटीव्हीत कैद