औरंगाबाद : सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाचं भय पसरलं आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात आपले हातपाय पसरले आहे. महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या 1 लाखांच्या पार पोहोचला आहे. कोरोनाच्या या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण पसरलं आहे. अशातच या काळात काही सकारात्मक घटनाही घडताना दिसत आहेत. काही लोक या संकटाला सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत. तसेच एकमेकांना मदत करत आहेत. तर काहींनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता कोविड सेंटरसाठी आपला सोळा खोल्यांचा बंगला देवू केला आहे. महाराष्ट्रातल्या औरंगाबाद शहरात एकीकडे रोज कोरोनाचा आलेख वाढत असला तरी दुसरीकडे माणुसकीचा आलेखही ही वाढताना पाहायला मिळतो आहे.


औरंगाबादमध्ये रोज 100 रुग्ण वाढत आहेत. लोकांची चिंताही वाढते आहे. रुग्णांना बेड मिळणं कठीण होत चाललं आहे. मात्र या चिंतेतही काही सकारात्मक बातम्या कोरोनावर मात करण्याचं बळ देत आहेत.


एकीकडे आपल्या कॉलनीत कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून लोक गेट बंद करत आहेत. कॉलनी देखील सील करत आहेत. तर शेजारच्या कॉलनीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घेऊन जाण्यासाठी येणारी गाडी ही आपल्या कॉलनी समोर लावू देत नाहीत. मात्र, दुसरीकडे औरंगाबादेतील एन फोर, गुरूसहानी भागातील तिरुपती कॉलनीने एक नवा आदर्श घालून दिला आहे. याच कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका अकरा वर्षाच्या मुलीला कोरोनाची लागण झाली. तिचे वडीलही कोरोनामुळे नांदेडमधील रुग्णालयात उपचार घेत होते. तिची आई एकटीच मुली सोबत होती. आई पुरती घाबरून गेलेली. या काळात कॉलनीतील लोक एकत्र आले आणि मुलीला कॉलनीतच उपचार देण्याबाबत सर्वांच एकमत झालं. कॉलनीत एक फ्लॅट रिकामा होता. फ्लॅटच्या मालकाला फोन केला, त्यानेही सकारात्मक प्रतिसाद देत कॉलनीच्या लोकांकडे चावी दिली. जवळपास दोन वर्षांपासून हा फ्लॅट बंद असल्याने त्यामध्ये जाळ्या झाल्या होत्या. कॉलनीतल्या लोकांनी फ्लॅटची साफ-सफाई केली आणि मुलीला कॉलनीतच उपचार द्यायला सुरुवात केली. विशेष म्हणजे, कॉलनीतील महिलांनी यासाठी पुढाकार घेतला होता. या भागातील नगरसेवक प्रमोद राठोड सांगतात, यांनी ज्या वेळेसची कल्पना आमच्या समोर मांडली त्यावेळी काही क्षण मलाा विश्वासही बसला नाही. एवढ्या सकारात्मकतेने लोक एकमेकांची दुःखात मदत करतात. याचा अभिमान असल्याचंही त्यांनी सांगितलं.


कॉलनीतील क्षमा कुरे यांनी सांगितले की, 'आम्ही गेली कित्येक वर्षे एकत्र राहतो, सुखात सोबत असतो, तर त्यांना दुःखात एकटं कसं सोडता येईल. या कॉलनीचा सकारात्मक दृष्टीकोनाचा आदर्श इतर कॉलनींही घेतला तर कोरोनामुळे मानसिकता खचलेल्या रुग्णांना उपचारासाठी सकारात्मक ऊर्जा नक्की मिळेल.


औरंगाबादमध्ये अशीच आणखी एक सकारात्मक घटना पाहायला मिळाली. ही घटना औरंगाबाद शांतिनिकेतन भागातील आहे. या भागात हरिश्चंद्र मित्तल यांचा 4050 स्क्वेअर फुटांचा 16 खोल्यांचा एक बंगला आहे. हा संपूर्ण बंगला ते तात्पुरत्या स्वरूपात कोविड सेंटर उभं करून रुग्णांवर उपचार करण्यासाठी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच यासंदर्भातील पत्रही त्यांनी औरंगाबाद महानगर पालिकेला दिले आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे, त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी भविष्यात जागा कमी पडू नये, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. या बंगल्यात सोळा रूममध्ये चाळीस ते पन्नास जण उपचार घेऊ शकतात. त्यासाठी त्यांनी या रूममध्ये बेड, पंखे, लाईट या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.



कोरोनाच्या संकटामध्ये राज्यात अशा अनेक घटना घडल्या ज्यावरून खरोखरच माणुसकी शिल्लक आहे का नाही हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र या दोन्ही घटना पाहिल्या तर आजही माणुसकी जिवंत आहे आणि भावना असलेली ही लोकं आजही लोकांची सेवा करण्यासाठी खारीचा वाटा उचलत आहेत. या दोन्ही उदाहरणांचा आदर्श घेतला तर निश्चितच कोरोनाला सकारात्मक दृष्टीने मात करण्यात मदत होईल.


महत्त्वाच्या बातम्या : 


औरंगाबादमधील सोसायटीचा आत्मनिर्भर उपक्रम; सोसायटीतच 20 खाटांचा आयसोलेशन वॉर्ड तयार