औरंगाबादेत खड्ड्यांचा फटका जवानाला, अपघातात गंभीर जखमी
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 12 Sep 2016 03:25 AM (IST)
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये रस्त्यात जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे सामान्य नागरिक तर त्रस्त आहेतच, मात्र त्याचा फटका आता चक्क एका जवानालाही बसला आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन एक जवान गंभीररित्या जखमी झाला आहे. आभादेव जाधव असं जखमी जवानाचं नाव आहे. आभादेव यांची अरुणाचल प्रदेशमध्ये नियुक्ती झाली आहे. सध्या सुट्टीनिमित्त ते गावी आले आहेत. मात्र काल रेल्वे स्टेशनकडे जात असताना खड्ड्यांमुळे त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्याव घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली असून खड्डे दुरुस्त करण्याची मागणी नागरिक वारंवार करत आहेत.