मुंबई : मराठी रंगभूमीवरचा हरहुन्नरी कलाकार अभिनेते अतुल परचुरे यांचे 57 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी नाट्य आणि सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे. अतुल परचुरे हे मराठी आणि हिंदी सिनेमा, नाटक, मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचले होते. आपल्या खुमासदार आणि विनोदी अभिनय शैलीने त्यांनी प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं होतं. जवळपास एका वर्षापूर्वी त्यांनी कर्करोगावर मात केली होती. पाच दिवसांपूर्वी'सूर्याची पिल्ले' या नाटकाची तालीम सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्यांचं निधन झालं आहे.
अभिनेते अतुल परचुरे गेल्या वर्षी म्हणजे 16 सप्टेंबर 2023 रोजी एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी कॅन्सरमधून कसे बाहेर आले, त्यावर कशी मात केली याची माहिती दिली होती.
कॅन्सर झाल्याचं परचुरेंना कसं समजलं?
अतुल परचुरेंच्या लग्नाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ते कुटुंबीयांसोबत न्यूझीलंडला फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांना काहीच खायची इच्छा होत नव्हती. ही काहीतरी धोक्याची घंटा असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यावेळी त्यानी कुटुंबीयांना याबद्दल काहीच सांगितलं नाही. पण भारतात आल्यावरही त्यांना काहीच खायची इच्छा होत नव्हती. म्हणून एका डॉक्टर मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी अल्ट्रा सोनोग्राफी केली. त्यामध्ये त्यांना ट्युमर झाल्याचं समोर आलं.
चुकीचा उपचार आणि सेकंड ओपिनियन
हा आपल्यासाठी आणि कुटुंबीयांसाठी एक मोठा धक्का असल्याचं अतुल परचुरेंनी मुलाखतीत सांगितलं होतं. पण ते आजारी आहेत याची जाणीव त्यांच्या कुटुंबीयांनी कधीही करून दिली नाही. तुला काहीही होणार नाही असा विश्वास आईने दिल्याचा परचुरेंनी सांगितलं होतं. त्यावेळी मुंबईतील एका प्रतिष्ठित रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण त्यातून काहीच साध्य होत नव्हतं किंवा जगण्याची आशाही मिळत नव्हती. त्यांच्यावर कदाचित चुकीचे उपचार सुरू असतील असंही त्यांनी सांगितलं. मग नंतर सेकंड ओपिनियन घ्यायचं ठरवलं आणि पुण्यातील डॉ. शैलेश देशपांडे यांची भेट घेतली.
अतुल परचुरे हे डॉ. देशपांडे यांना भेटल्यानंतर त्यांच्यासाठी ही एकदम क्लीन आणि क्लीअर केस होती. त्यांच्यावर कोणतीही अॅक्टिव्ह ट्रीटमेंट सुरू झालेली नव्हती. पण देशपांडेंनी उपचार सुरू केले आणि परचुरेंना जगण्याची आशा मिळाली.
घशाला कोरड अन् हात-पाय सुजले
या काळात परचुरे यांची अवस्था काळजी करण्यासारखी झाली होती. त्यांचे पाय सुजले होते, घसा कोरडा पडत होता. पाणी प्यायल्याशिवाय कोणताही घास घशाखाली उतरत नव्हता. रात्र-रात्र झोप येत नव्हती. नकारात्मक विचारही येत असल्याचं परचुरेंनी सांगितलं होतं.
असं असलं तरी डॉक्टरांनी परचुरेंना एक आशेचा किरण दाखवला होता. त्याच मार्गावर नकारात्मक विचारांवर मात करून परचुरे आत्मविश्वासाने चालत राहिले. त्यामुळेच आपण कर्करोगावर मात करून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आल्याचं अतुल परचुरेंनी सांगितलं होतं.
मध्यमवर्गीयांसाठी मेडिक्लेम महत्त्वाचा
आताच्या काळात मध्यमवर्गीय माणसांनी आजारी पडणं ही गोष्ट खूप भयानक आहे. त्यावर खूप प्रमाणात पैसे खर्च होतात. आजारपणाच्या काळात आपल्याला मेडिक्लेमचा आधार मिळाला. त्यामुळे प्रत्येकाने मेडिक्लेम काढावं असं आवाहन अतुल परचुरेंनी केलं होतं.
आज अतुल परचुरे आपल्यात नाहीत. एका हरहुन्नरी अभिनेत्याने अशी अकाली एक्झिट घेणं हे अनेकांसाठी धक्कादायक आहे.
ही बातमी वाचा: