मुंबई: व्ही पी. बेडेकर अँड सन्सचे संचालक अतुल बेडेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी अखेचा श्वास घेतला आहे. सकाळी 11 वाजता त्यांच्या गिरगावातील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे. बेडेकर हे लोणची, मसाले व चटणी या पारंपारिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील प्रतिष्ठित नाव आहे.
1910 साली विश्वनाथ पर्शराम बेडेकर यांनी गिरगावात लहानसं किराणामालाचं दुकान सुरू केलं. त्याच दुकानात त्यांनी मसाले आणि लोणची ठेवण्यास सुरूवात केली. मसाले लोणची यांचा खप भरपूर व्हायला लागल्यावर दुकानांच्या शाखा काढायला सुरूवात केली. मुगभाट, दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच पाच दुकाने झाली. पुढे धंद्याचा व्याप वाढता राहिल्यावर 1943 मध्येच ‘व्ही. पी. बेडेकर आणि सन्स लिमिटेड’ असं कंपनीचं नामकरण केले. बघता बघता संपूर्ण महाराष्ट्र व्यापला.
फक्त देशात नाही तर ज्या ज्या देशात मराठी माणूस पोहचला तिथे तिथे अ बेडेकर उत्पादनंही पोहचली. 1960 साली भारतात प्रथम पी. पी. लीक प्रूफ कॅप्स बेडेकरांनी वापरल्या. आणि मग लोणचं निर्यात होऊ लागलं.कर्जतच्या फॅक्टरीत जवळपास 600 टन लोणचं सीझनला बनतं.महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये विक्री होते. त्याचबरोबर सातासमुद्रापलीकडे बेडेकर नाव पोहचले आहे. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्ये देखील निर्यात होते.