लातूर जिल्ह्यातील जाऊ या गावात विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या भागातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कातील लोकांना या ठिकाणी विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे. त्यांची वेळोवेळी तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी का करता? रिपोर्ट काय आले? ते का सांगत नाहीत? असा जाब विचारत या सेंटरवरील पाच लोक तिथे गेलेल्या तहसीलदार गणेश जाधव यांच्या अंगावर धावून गेले. तसेच मारण्याची धमकी दिली. यामुळे तहसीलदार गणेश जाधव यांनी किल्लारी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पाच लोकांवर शासकीय कामात अडथळा आणून गोंधळ घतल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्तफा लष्करे, आरिफ पटेल, आतीक पटेल (रा.औराद शहाजानी) सय्यद दुरानी, सय्यद सुभानी खान (रा. निलंगा) या पाच जणांचा यात समावेश आहे.
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 533 इतकी आहे. तर उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 525 इतकी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 50 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण आजपर्यंत 1108 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. काल जिल्हाभरात 28 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दोन रुग्णांचा मृत्यू झाला.