अमरावती : अमरावतीतील मेळघाटच्या जंगलात पुनर्वसित आदिवासी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांत टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. सरकारनं पुनर्वसित गावांत संपूर्ण सुविधा न पुरविल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वन अधिकारी आणि पोलिसांवर तुफान दगडफेक केली.


यावेळी गावकऱ्यांनी सरकारी गाड्यांचीही तोडफोड केली. गावकऱ्यांच्या हल्ल्यात 50 वन कर्मचारी आणि 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. केलपानी-धारगड-गुल्लरघाट येथील गावकऱ्यांनी कुऱ्हाडी, कोयता, लाल मिरची पावडर टाकून हल्ला चढवला आहे. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून या परिसरात कलम 144 लावण्यात आलं आहे. सरकारनं पुनर्वसित गावांत संपूर्ण सुविधा न पुरविल्याचा आदिवासी गावकऱ्यांचा आरोप आहे.

मेळघाटच्या अकोट वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या काही गावांचे 14 जानेवारी 2019 पासून पुनर्वसन झाले आहे.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित गावांची शासनाकडून उपेक्षा झाल्याचा आदिवासींचा आरोप आहे. यामुळे संतप्त झालेल्या आदिवासींनी मेळघाटातील आपल्या मूळ गावाकडे कूच करायला सुरूवात केली. काल दुपारी केलपानी, गुल्लरघाट आणि धारगड येथील गावकऱ्यांनी आपल्या मूळ गावांमध्ये प्रवेश केला.

याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक अकोट आणि पोलीस अधिकारी आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी आणि ज्या आंदोलनकर्त्यांना जंगलाबाहेर काढण्यासाठी गेले होते. चर्चा शांततेत सुरु असताना काही आंदोलक हिंसक झाले आणि त्यांनी पोलीस आणि वनविभागच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरु केली. तसेच विळा आणि कुऱ्हाडींच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यात 50 वन कर्मचारी आणि 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी 3 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर गावकऱ्यांनी शासनाच्या 15 गाड्यांची तोडफोड केली आणि जंगलाला देखील मोठ्या प्रमाणात आगी लावल्या आहेत.