मुंबई : आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन एटीएसने नऊ जणांना ताब्यात घेतलं आहे. यात ठाण्यातील मुंब्रा परिसरातून तीन आणि औरंगाबादेतून सहा जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून साहित्यही जप्त करण्यात आलं आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एटीएसने जोरदार कारवाइला सुरुवात केली आहे. मुंब्रा आणि औरंगाबादमध्ये अतिरेक्यांचा स्लीपर सेल कार्यरत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. मुंबईजवळच्या मुंब्रा आणि औरंगाबाद या भागात एटीएसने कारवाई केली. अनेक ठिकाणी छापे टाकून आयसिसच्या संबंधित नऊ जणांना ताब्यात घेतलं आहे.
मुंब्रा परिसरात सागर अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मोहम्मद मजहर शेख या तरुणाच्या घरात सोमवारी मध्यरात्री तीन वाजता ठाणे एटीएसने छापा टाकून त्याला ताब्यात घेतलं. त्यानंतर एटीएसने मोहसीन खान आणि फहाद शाह या दोघांनाही ताब्यात घेतलं. हे तिन्ही तरुण उच्चशिक्षित आहेत.
हे तिघेही बंगळुरुमधील असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेच्या औरंगाबाद इथल्या शाखेच्या संपर्कात होते. सलमान नावाचा तरुण औरंगाबादमधील शाखा चालवत होता. तिघे संबंधित संस्थेत जाऊन शिक्षा घेत असल्याचा संशय एटीएसला होता. संबंधित संस्था ही देशविरोधी कार्य करत असल्याचा अंदाज एटीएसला होता. एटीएसने सलमानलाही ताब्यात घेतलं आहे.
या प्रकरणात मझहर शेखच्या घरातील एकूण सहा मोबाईल जप्त केलं असून त्यापैकी चार मोबाईल बंद अवस्थेत होते. इतर दोन मोबाईल आई आणि भावाचे ताब्यात घेतलं असून दोन सिम कार्ड आणि एक लॅपटॉपही ताब्यात घेतला आहे.
या सर्वांचे मोबाईल्स, लॅपटॉप आणि मेल्सचीही तपासणी सुरु आहे. तसंच या संशयितांकडून कुठे घातपाताचा प्लॅन होता का याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे. ठाणे एटीएसनंतर आता त्यांचा ताबा मुंबई एटीएसने घेतला असून पुढील तपास सुरु आहे.