नाशिक : येणारी निवडणूक ही महाराष्ट्र काँग्रेसच्या दृष्टीने महत्वाची आहे. या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत चर्चा करणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले. वंचित आघाडीवर भाजपची बी टीम असल्याची केलेली टीका ही राजकीय होती, असेही चव्हाण म्हणाले.

चव्हाण म्हणाले की,  माणिकराव ठाकरे यांच्यावर वंचित आघाडीबरोबर  चर्चा करण्याची जबाबदारी दिलेली आहे.  मनसेला सोबत घेण्याबाबत अद्याप विचार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. मनसेला घेण्याबाबत मतभेद आहेत, असे ते म्हणाले.



आगामी निवडणुकांसाठी समविचारी पक्षांशी आघाडी करण्याआधी जिल्हा अध्यक्षांना विश्वासात घेऊन त्यांचे म्हणणे ऐकण्यात आले आहे. यावेळी नवीन चेहऱ्यांना आणि तरुण तसेच महिलांना संधी देणार असल्याचे देखील चव्हाण म्हणाले.

राष्ट्रवादीशी आघाडी करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने तत्वतः निर्णय घेतला आहे.  8 दिवसात जागा निश्चिती होईल तसेच  इतर समविचारी पक्षांशी बैठक होणार आहे, असेही चव्हाण म्हणाले.  6 जुलैपर्यंत राज्य भरातून इच्छुकांचे अर्ज मागविले जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

निवडणुकीच्या आधी राज्य सरकारचे अपयश लोकांपर्यंत मांडणार आहोत. स्थानिक प्रश्न, कर्जमाफी, कर्ज वाटप  या विषयावर आंदोलनं केली जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

हवा येते तशी जाते.  ही निवडणूक झाल्यानंतर कळेल कोणाची हवा आहे. गिरीश महाजन 50 पेक्षा जास्त काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार नाहीत असे म्हणाले. मात्र असे सांगणे म्हणजे ईव्हीएम फिस्क आहेत, असा आरोप चव्हाण यांनी लावला. मतपत्रिकेचा वापर करणार की नाही याबाबत महाजन यांनी बोलावे. साम दाम दंड भेद याचा वापर भाजप कडून केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.