मुंबई: आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे मराठा आरक्षणालाही केंद्र सरकारने घटनात्मक संरक्षण द्यावे. सध्या सुरु असलेल्या संसदेच्या अधिवेशनात केंद्राने मराठा आरक्षणासाठी आवश्यक ती घटनात्मक तरतूद करावी, अशी मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षण सुनावणीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते.


मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर सध्या सुनावणी सुरु आहे. आज या प्रकरणी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षण प्रकरणामध्ये 18 मार्च रोजी अॅटर्नी जनरल यांनी भूमिका मांडावी असे निर्देश दिले आहेत.


यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, "मराठा आरक्षणाच्या मार्गात अनेक संवैधानिक व कायदेशीर बाबींचे पेच आहेत. हे पेच दूर करण्यासाठी संसदेच्या पातळीवर आवश्यक ती संवैधानिक तरतूद करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास मराठा आरक्षण व देशातील इतरही अनेक राज्यांच्या आरक्षणाचे प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल. मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सकारात्मक भूमिका घ्यावी. यासाठी केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी पुढाकार घेऊन पंतप्रधानांना विनंती करावी."


Maratha Reservation : मराठा आरक्षणावरील सुनावणी आता 8 ते 18 मार्चदरम्यान, राज्यसरकारसह केंद्रही मांडणार बाजू


अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयातील एसईबीसी आरक्षण प्रकरणाची सुनावणी ऑनलाईनऐवजी प्रत्यक्ष व्हावी, ही राज्य सरकारची भूमिका जवळपास मान्य झाल्यासारखी आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणीसाठी 8 मार्च ते 18 मार्चपर्यंतच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 1 मार्चपासून सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज ऑनलाईनऐवजी प्रत्यक्षपणे होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे ही सुनावणी प्रत्यक्ष रुपात होईल अशी अपेक्षा आहे."


एसईबीसी आरक्षण प्रकरणामध्ये 18 मार्च रोजी अॅटर्नी जनरल यांनी भूमिका मांडावी, असे सर्वोच्च न्यायालयाने आज सांगितले. अॅटर्नी जनरल यांच्या माध्यमातून केंद्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन अनुकूलता दर्शवली तर त्यातून चांगलेच निष्पन्न होईल. त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल काय भूमिका मांडतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष असेल असे अशोक चव्हाण म्हणाले.


राज्यातील भरती प्रक्रिया पुढे ढकला अशी मागणी विनायक मेटे करत आहेत. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले की, "मेटे काय म्हणतात ते महत्वाचं नाही. राज्यातील परीक्षा होतील आणि न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे पुढील कारवाई होईल."


देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं आणि टिकवलं ही वस्तुस्थिती- शिवेंद्रराजे