मुंबई: कोरोना काळात नागरिकांना भरमसाठ आलेली वीज बिले माफ करण्यात यावीत या मागणीसाठी भाजपने राज्यभर आंदोलन सुरु केलंय. राज्यात जिल्ह्यांच्या ठिकाणी आणि महत्वाच्या शहरांत भाजपने आंदोलन सुरु केलंय. महाविकास आघाडीविरोधात घोषणा देत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी महावितरण कार्यालयाला टाळं ठोकलं आहे.


लॉकडाऊन काळात महाआघाडी सरकारने नागरिकांना वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली होती. मात्र आता राज्य सरकारला त्याचा विसर पडल्याचा आरोप भाजपने केला आहे. आता त्या विरोधात भाजपने राज्यभर आंदोलन करुन सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


पुण्यातदेखील भाजपने महावितरणच्या विरोधात आंदोलन केले. पुण्यातील निलायम थिएटर येथील महावितरणच्या कार्यालयाला भाजप आंदोलनकर्त्यांनी टाळं ठोकलं. यावेळी सरकारविरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली. कोरोना काळात सरकाने ग्राहकांना वाढीव बिल दिली. राज्य सरकारने तात्काळ वीज बिल माफ करावं आणि जी बिल वसुली सरकारने सुरु केलीये ती तात्काळ थांबबवी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आलं. जर वीज वसूली थांबवली नाहीतर यापुढेचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा भाजपने दिला आहे.


नाशिकमध्ये आंदोलनाच्या दरम्यान भाजप पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे शरणपूर रोड परिसरातील महावितरणच्या कार्यालयाबाहेर काही काळ गोंधळ निर्माण झाला. नाशिकमधील महावितरणच्या कार्यालयाला आमदार देवयानी फरांदेनी टाळं ठोकलं.


केंद्राच्या 'त्या' प्रस्तावामुळं गरीब, मध्यमवर्गीयांसाठी वीज ही चैनीची वस्तू ठरेल; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची टीका


कोल्हापूरातही वीज बिल माफ व्हावं यासाठी भाजपच्या वतीनं महावितरणाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येतंय. भाजपच्या वतीनं ताराबाई पार्क परिसरातील महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर टाळे ठोक आंदोलन सुरु केलंय. त्यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बीडच्या महावितरण कार्यालयाला भाजप कार्यकर्त्यांनी लावलं कुलूप लावलं आहे. तसेच महावितरण आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


ही परिस्थिती आकोला जिल्ह्यातही पहायला मिळाली. वाढीव वीजबील आणि थकीत वीज कनेक्शन तोडण्याच्या विरोधात भाजपनं महावितरणच्या दुर्गा चौकातील विभागीय कार्यालयाला टाळं ठोकलं. यासोबतच गोरक्षण रोडवरील शहर कार्यालयालाही ठोकण्यात आलं. आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात गोरक्षण मार्गावरील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं.


अहमदनगरमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद गंधे आणि महापौर बाबासाहेब वागळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आंदोलन केले आहे. वाढीव वीज बिल आणि वीज तोडणीच्या विरोधात भाजपने महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करुन महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी महाविकास आघाडीच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आली. सरकारला जाग यावी आणि वाढीव वीज बिल रद्द करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील वीज अभियंता कार्यालयावर भाजपनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं.


सांगलीमध्ये भाजपा महिला आघाडीच्या वतीने वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोका आंदोलन करण्यात आले . वीज कनेक्शन तोडणी नोटीसाच्या विरोधात राज्य सरकार आणि वीज वितरण कंपनीचा निषेध नोंदवत, निदर्शने करत वीज बिल माफ करण्याची यावेळी मागणी करण्यात आली. राज्य सरकारने तातडीने वीज बिल माफ करण्याची भूमिका घ्यावी, त्यासाठीचा निधी वीज वितरण कंपनीला द्यावा, तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये वीज कनेक्शन तोडू देणार नाही, अन्यथा भाजपा महिला आघाडी आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष स्वाती शिंदे यांनी दिला आहे.


जुळे सोलापूर परिसरात माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने विजबिल वाढीच्या तसेच राज्य सरकारच्या विरोधात महावितरणच्या कार्यालावर मोर्चा काढण्यात आला. तसेच सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सर्वसामान्य लोकांनी वीज बिल न भरल्यास कनेक्शन तोडण्याच्या नोटिसा दिल्याचा निषेध माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी केला.


पहा व्हिडीओ: "सरकार वर्षभरात इतकं गरीब झालं की वीज कनेक्शन तोडावं लागतंय?" चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल