सांगली : काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा सांगलीमध्ये रात्री दाखल झाली. वसंतदादा पाटील यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जत विधानसभेच्या जागेवर दावा करत उमेदवारही जाहीर केला.


''जत विधानसभेच्या जागेबाबत तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही. विक्रम सावंत यांना 55 हजार मतं मिळाली होती. आघाडी झाली तर 80 हजार मतं मिळतील. जतची जागा काँग्रेसची असेल,'' अशी ग्वाही अशोक चव्हाण यांनी दिली. शिवाय काँग्रेसकडून विक्रम सावंत उमेदवार असतील हे स्पष्टही केलं.

जत ही जागा आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. 2014 मध्ये स्वबळावर लढल्यामुळे राष्ट्रवादीकडून तेव्हा प्रकाश शेंडगे लढले, त्यांना 29 हजार 937 मतं मिळाली. तर काँग्रेसच्या विक्रम सावंत यांना 55 हजार मतं मिळाली होती. सध्या इथे भाजपचे विलासराव जगताप आमदार आहेत, ज्यांना 72 हजार मतं मिळाली होती.

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभेत पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेसच्या अधिकच्या जागा निवडून येतील, अशी ग्वाही जतमधल्या सभेत हर्षवर्धन पाटील यांनी अशोक चव्हाण यांना दिली.

पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. पण काँग्रेस जनसंघर्ष यात्रेत अधिक आक्रमक होताना दिसत आहे.