पंढरपूर : माथेरानची टॉय ट्रेन आकर्षक रूपात धावण्यासाठी तयार झाली आहे. खास माथेरानच्या पर्यटकांसाठी कुर्डुवाडीच्या वर्कशॉपमध्ये  टॉय ट्रेनला एसी डबा जोडण्यात येणार आहे. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच मिनिगेजला एसी डबा जोडण्यात येत आहे.

कुर्डुवाडीमध्ये बनलेली ही आकर्षक फुलराणी पुढील महिन्यात सेवेत दाखल होणार आहे. यामुळे माथेरानच्या राणीची सफर करणाऱ्या पर्यटकांना आता गारेगार प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

नेरळ पासून माथेरानला जाणाऱ्या माथेरान लाईट रेल्वेने शंभर वर्ष पूर्ण केली आहेत. याच पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी एसी डबा जोडण्याची कल्पना अधिकाऱ्यांना दिली आणि मग कुर्डुवाडीच्या कारखान्यात याचा प्रयोग सुरु झाला. अधिकाऱ्यांनी पियुष गोयल यांच्या कल्पनेला सत्यात उतरवत फुलारणीचे रुपडेच पालटले.

आकर्षक डबे

या डब्यावर आकर्षक पद्धतीने निसर्गचित्रे लावण्यात आली आहे. डब्यात प्रवेश करताच डब्यातील आकर्षक आसनव्यवस्था पर्यटकांना भुलवून टाकणारी आहे. तसेच डब्याला मोठ्या काचा लावण्यात आल्या असून आता पर्यटकांना त्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे .

पर्यटकांसाठी खास सुविधा

डब्यात 16 आसने असून या डब्याच्या दोन्ही बाजूला वर्तणुकीत यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्यटकांना गारेगार प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

डब्याच्या छताला निळ्याशार आकाशाचे रूप दिल्याने डब्यात बसून खुल्या हवेत प्रवास केल्याचा आनंद पर्यटकांना मिळणार आहे .

सध्या या ट्रेनचे पाच डबे तयार असून आणखी पाच डब्यांचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे . या गाडीच्या प्रथमश्रेणी, द्वितीय श्रेणीच्या डब्यालाही नवे रूप देण्यात आले आहे. कुर्डुवाडीत बनणारे कोच आता माथेरानच्या राणीची शोभा वाढवणारे ठरणार असून ही टॉय ट्रेन पर्यटकांना भुरळ पाडणारी ठरणार आहे.