मुंबई : कोस्टल रोडच्या कामात ऑक्टोबर 2018 ते डिसेंबर 2020 याकाळात सुमारे एक हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार करून शिवसेनेने या घोटाळ्यात भागिदारी केली आहे काय? असा सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे


भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कोस्टल रोडच्या कामात घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेनेवर केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत मुख्यमंत्र्यानी चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केलीय. त्यांचा रोख युवासेनेवर होता. आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्रही लिहिलं आहे. ज्यात गंभीर आरोप केले आहेत.


आशिष शेलार यांचे आरोप काय?


1. कोस्टल रोडच्या टप्पा एक मधील भरावासाठी लागणारा दगड आणि साहित्य हे शासनाच्या परवानाधारक खाणीतून न उचलता ते अन्य ठिकाणाहून उचलण्यात आल्याने सदर कंत्राटदार कंपनीने महाराष्ट्र सरकारला रॉयल्टीतून मिळणाऱ्या रुपये 437 कोटींची अफरातफर केली आहे. कुणाचा वरदहस्त यामागे आहे?


2. भरावासाठी टेंडरमधे नमुद केलेल्या अटींपेक्षा उच्च घनतेच्या व कमी दर्जाच्या भराव साहित्याचा वापर करुन महापालिकेकडून अतिरिक्त रुपये 48.41 कोटी वसूल करण्यात आले आहेत. हे महापालिकेचे नुकसान का करण्यात आले?


3. कोस्टल रोड कंत्राटदारांने भराव सामग्रीची वाहतूक करताना बेकायदेशीर व ओव्हरलोड वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस वाहतूक विभागाने आकारलेला दंड सुमारे 81.22 कोटी रुपये का भरण्यात आला नाही? हा दंड माफ करुन यामध्ये कोणी कट कमिशन घेण्यासाठी काही षडयंत्र रचते आहे का? तसेच 35 हजार बोगस फेऱ्या दाखवण्यात आल्याची माहिती आमच्याकडे आहे. हे खरे आहे काय?


4. कंत्राटदारांनी पुरवलेल्या निकृष्ठ दर्ज्याचे साहित्य वादळांमध्ये वाहून गेले ते नुकसान महापालिकेकडून वसूल करण्यात आले का? साहित्यामुळे महापालिकेचे 17.86 कोटी नुकसान का करण्यात आले? हा भुर्दंड पालिकेला का?


कोस्टल रोडच्या पॅकेज 1 मधील फसवणूकीची रक्कम रुपये 684 कोटीहून अधिक असून एकूणच प्रकल्पामधील बेकायदेशीरपणामुळे ही रक्कम रुपये हजार कोटींपेक्षा जास्त असेल, असा दावा शेलार यांनी केलाय. त्यामुळे या प्रकरणात एसआयटी स्थापन होऊन चौकशी होते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.