बीड :  करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना आज न्यायालयात दाखल केलं. कोर्टानं त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून आरोपी अरुण मोरे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशाखा रविकांत घाडगे यांनी करुणा शर्मा यांच्या विरोधात पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार कलम 307 आणि अॅट्रोसिटी कायद्याखाली हा करुणा शर्मा आणि अरुण दत्ता मोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, परळीमध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर काल वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं व घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता.


दरम्यान न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर करुणा शर्मा यांनी लगेच जामिनासाठी अर्ज केला. मात्र करुणा शर्मा यांनी जामीन अर्जावर सही केली नसल्याची माहिती आहे. माझा वकील आल्या शिवाय जामीन अर्ज करणार नाही, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. आपण हा गुन्हा केला नसल्याचं करुणा शर्मा यांनी कोर्टासमक्ष सांगितलं आहे. करुणा शर्मा यांना बीड शहरातील जिल्हा कारागृहात नेणार असल्याची माहिती आहे.


Karuna Sharma | करुणा शर्मा यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?


करुणा शर्मा यांनीच मांडली स्वतःची बाजू


न्यायालयात हजर केल्यानंतर करुणा शर्मा यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी परळी पोलिसांनी मागितली होती. यावेळी करुणा शर्मा यांनी स्वतः आपली बाजू कोर्टासमोर मांडली. सुरुवातीला त्यांना मराठी मध्ये लिहिलेला मजकूर समजला नाही. त्यामुळे त्यांनी ही माहिती हिंदी मधून सांगण्यात यावी अशी मागणी केली. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सहा. सरकारी अभियोक्ता अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले. तर, करुणा शर्मा यांचे वकील पोहोचू न शकल्याने न्यायालयासमोर त्या स्वतःच स्वतःची बाजू मांडली.


काल करुणा शर्मा यांनी मंदिर परिसरामध्ये महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. म्हणून शर्मासह मोरे यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाहनात पिस्तुल सापडल्याच्या आधारावर गाडी चालक दिलीप पंडित अंदेरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिरासमोर जमा झालेल्या जमावावर कोरोना निर्बंधासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


करुणा शर्मा यांना 149 अन्वये नोटीस


करुणा शर्मा यांना 149 अन्वये नोटीस देण्यात आली आहे.. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या घरी जाऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काही विधान करू नये, असं या नोटिशीत म्हटलं आहे. काल करुणा शर्मा यांनी मंदिर परिसरामध्ये महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून शर्मासह मोरे यांच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच वाहनात पिस्तुल सापडल्याच्या आधारावर गाडी चालक दिलीप पंडित अंदेरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदिरासमोर जमा झालेल्या जमावावर कोरोना निर्बंधासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे करुणा यांच्या फिर्यादीवरून जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


त्या व्हिडीओची चौकशी सुरु- पोलिस अधीक्षक
जिल्हा पोलिस अधीक्षक आर राजा यांनी सांगितलं की, त्यांच्या गाडीत पिस्टल कोणी ठेवलं याची चौकशी चालू आहे.  आम्ही त्यांना मंदिराकडे जाऊ नका असे सांगितले होते.  मात्र त्या गेल्या. मंदिरासमोर जमा झालेल्या जमावावर कॉरोना निर्बंधासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं एसपी आर राजा यांनी सांगितलं. काल परळी मध्ये करुणा शर्मा यांच्या बाबतीत जे घडलं त्यासंदर्भात आज बीडचे पोलीस अधीक्षक आर राजा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यासंदर्भात अधिक माहिती दिली.  यावेळी बोलताना ते म्हणाले की करुणा शर्मा यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गाडीत सापडले या प्रकरणी गाडीच्या चालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणानंतर करुणा शर्मा यांच्या गाडीत ठेवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर बोलताना पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे की, या व्हिडिओची आम्ही चौकशी करत आहोत आणि यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे देखील ते म्हणाले. तर करुणा मुंडे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्यासमोर जमाव झाला होता त्यांच्यावर देखील जमाबंदीच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.