पंढरपूर : आषाढी सोहळ्यासाठी (Ashadhi Wari)  येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन मिळावे यासाठी आजपासून परंपरेनुसार देवाचा पलंग निघाला असून मंदिर जरी बंद असले तरी विठुराया आता चोवीस तास दर्शनासाठी उभा असणार आहे. आषाढीला येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना देवाचे दर्शन मिळावे यासाठी ही परंपरा वर्षानुवर्षे विठ्ठल मंदिरात सुरु असून गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे मंदिर जरी भाविकांसाठी बंद असले तरी ही परंपरा मात्र सुरु आहे. 


आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी देवाची पूजा करून देवाच्या पाठीमागे मऊ कापसाचा लोड लावला आणि नंतर देवाच्या शेजघरातील देवाचा पलंग काढण्यात आला. याच पद्धतीने रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग देखील काढण्यात आला असून मातेच्या पूजेनंतर देवीच्या मागे कापसाचा तक्क्या लावण्यात आला आहे. आजपासून विठ्ठल रुक्मिणी भाविकांसाठी चोवीस तास दर्शनाला उभे राहणार असल्याने त्यांना थकवा जाणवू नये यासाठी पाठीच्या मागे कापसाचे लोड आणि तक्क्या लावायची प्रथा चालत आलेली आहे. आजपासून देव झोपायलाच जाणार नसल्याने देवाचे सर्व राजोपचार बंद झाले असून आता देवाला सकाळी नैवेद्य , सायंकाळी लिंबूपाणी आणि सकाळी नित्यपूजा एवढेच उपचार केले जाणार आहेत.  विठ्ठल मंदिर बंद असले तरी  आता भाविकांना आजपासून रात्रंदिवस मंदिराच्या वेबसाईटवर विठुरायाच्या दर्शनाचा आनंद घेता येणार आहे.  


वारकरी संप्रदायाचा सर्वात सोहळा अशी ओळख असलेल्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे संकट असल्याने सरकारने दहा मानाच्या पालखी सोहळ्यांना पंढरपूरला येण्याची परवानगी दिली आहे. 20 जुलै रोजी आषाढी एकादशी साजरी होणार आहे.


या दहा पालख्यांना परवानगी


 -संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)
- संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)
-  संत सोपान काका महाराज (सासवड)
- संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)
- संत तुकाराम महाराज (देहू)
- संत नामदेव महाराज (पंढरपूर)
- संत एकनाथ महाराज (पैठण)
- रुक्मिणी माता (कौडनेपूर-अमरावती)
- संत निळोबाराय (पिंपळनेर - पारनेर अहमदनगर)
- संत चंगतेश्वर महाराज (सासवड)


कोरोना संकटात सलग दुसऱ्या दिवशी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून 17 जुलैपासून 25 जुलैपर्यंत पंढरपूर शहरासह शेजारच्या 10 गावात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे . या संपूर्ण 9 दिवसाच्या कालावधीत पंढरपूर डेपोमधील एसटी बस सेवेसह सर्व खाजगी वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आषाढ शुद्ध अष्टमी अर्थात 17 जुलैच्या दुपारी 2 वाजल्यापासून संचारबंदीला सुरुवात होणार असून हे संचारबंदी 25 जुलै म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दुपारी चार वाजेपर्यंत राहणार आहे.  


Ashadhi Wari : पंढरीची वारी झाली तर देशातीलच नव्हे जगातील कोरोना नामशेष होईल- संभाजी भिडे


Ashadhi Wari 2021 : आषाढी यात्रा काळात नऊ दिवस एसटी बस सेवेसह पंढरपूरमधील सर्व वाहतूक बंद