पंढरपूर : कोरोना संकटात सलग दुसऱ्या दिवशी होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून 17 जुलैपासून 25 जुलैपर्यंत पंढरपूर शहरासह शेजारच्या 10 गावात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे . या संपूर्ण 9 दिवसाच्या कालावधीत पंढरपूर डेपोमधील एसटी बस सेवेसह सर्व खाजगी वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आषाढ शुद्ध अष्टमी अर्थात 17 जुलैच्या दुपारी 2 वाजल्यापासून संचारबंदीला सुरुवात होणार असून हे संचारबंदी 25 जुलै म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दुपारी चार वाजेपर्यंत राहणार आहे. पंढरपूर शहरासह शेजारील वाखरी, भटुंबरे, चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, कोर्टी , गादेगाव, शिरढोण आणि कौठाळी या दहा गावात या नऊ दिवसात काटेकोरपणे संचारबंदीचे अवलंब केले जाणार आहेत. यात्रा कालावधीत शासनाने परवानगी दिलेल्या भाविकांशिवाय एकही भाविकाला शहरात येत येणार नसून यासाठी जिल्हा सीमा, तालुका सीमा आणि शहर सीमेवर पोलिसांची त्रिस्तरीय नाकेबंदी केली जाणार आहे. आषाढी यात्रा काळात म्हणजे 17 जुलै पासून 25 जुलैपर्यंत केवळ शासनाने परवानगी दिलेल्या वारकऱ्यांना स्नानाची परवानगी दिली असून इतर वारकऱ्यांना प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेशही दिले आहेत.
ज्या मानाच्या 10 पालखी सोहळ्यांना परवानगी दिली आहे त्यामधील प्रत्येक पालखीतील 40 भाविकांची RTPCR तपासणी करून मगच त्यांना पंढरपूर कडे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे . या सर्व 400 वारकऱ्यांना संबंधित पालखी सोहळे पासेस देणार आहेत . या परवानगी दिलेल्या 400 वारकरी दहा पालखी सोहळ्यासोबत 19 जुलै म्हणजे आषाढ शुद्ध दशमी दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत वाखरी येथील पालखी तळावर बसने पोचतील. हे दहा पालखी सोहळे वाखरी पालखी तळापासून पंढरपूर शहराच्या विसाव्यापर्यंत पायी चालत येतील. येथे 10 पालखी सोहळ्यातील संतांच्या पादुका 20 वारकरी घेऊन पंढरपूर शहरात पोचतील तर उर्वरित 380 वारकरी बसने आपापल्या मठात पोहचतील.
आषाढी एकादशी ला पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शासकीय महापूजा करणार आहेत. आषाढीसाठी आलेले पालखी सोहळे 24 जुलै रोजी परतीचा प्रवास करतील असे आदेश देण्यात आले आहेत .