Sant Nivruttinath Palkhi : "गुण गाईन आवडी, माझे पंढरीचे आई, काय महिमा वर्णावा किती, विठुरायाच्या नगरी', विठोबा रखुमाई... जय जय विठोबा रखुमाई..." अशा भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी मार्गक्रमण करत आहे. संत निवृत्तीनाथांची पालखी (Sant Nivruttinath Palkhi) नगर जिल्ह्यात असून कालच्या राजुरी मुक्कामानंतर दिंडीनं बेलापूरकडे प्रस्थान केलं आहे. तर काल देऊळगाव राजा इथे मुक्कामी असलेली मुक्ताबाईंची पालखी आज सकाळी जालना शहराजवळील काजळा फाट्यावर मुक्कामी असणार आहे. 


विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले वारकरी, तरीही अभंगांच्या गोडीनं अन् विठ्ठलाच्या ओढीनं एक एक पाऊल पंढरीच्या दिशेनं टाकत आहेत. हजारो-लाखो वारकऱ्यांची पायी वारी सुरू आहे. संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा नववा दिवस आहे. ज्या ज्या ठिकाणी पालखी थांबते आहे, त्या ठिकाणी स्वागत करून दुसऱ्या दिवशी गावासह इतर परिसरातील वारकरी दिंडीत सामील होत आहेत. नगर जिल्ह्यातील राजुरी येथे मुक्कामी असलेली  संत निवृत्तीनाथांची पालखी पुढे बेलापूर गावाकडे मार्गस्थ झाली आहे. आज राजुरीहुन निघून पुढे संगनमनेर तालुक्यातुन श्रीरामपूर तालुक्यात प्रवेश करत बेलापूर मुक्कामी प्रस्थान करणार आहे.


लांबवरून दिसणारी दिंडी पालखी, अभंगाचा आवाज, विठुरायाच्या सुरू असलेला गजर या भक्तिमय वातावरणात दिंडी मार्गावरील भाविक आनंदून जात आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. यात संत निवृत्तीनाथांच्या दिंडीसह जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल जालना शहरात प्रवेश केला. येथील कन्हैय्या नगरमध्ये दिंडी मुक्कामी होती. आज पालखीचा नववा दिवस असून जालना शहरातून प्रस्थान करत दिंडी पुढे मार्गस्थ झाली आहे. तर दुपारी शहरातील पांजरापोळ भागात दुपारचा विसावा घेणार आहे. त्यानंतर संत मुक्ताबाईंची दिंडी जालना शहरातुन पुढे शहराजवळील काजळा फाट्यावर जय हरी मंडळाच्या निवारागृहात विसावा घेणार आहे. 


आज पालख्यांचा मुक्काम कुठे?


संत निवृत्तीनाथांची पालखी आज राजुरी येथून पायमार्गाने ममदापुर, नांदूर, खंडाळा, श्रीरामपूर या गावावरून जाणार आहे. तर दुपारचे जेवण श्रीरामपूर शहरात होणार आहे. तर मुक्कामासाठी संत निवृत्तीनाथांची दिंडी बेलापूर येथे जाणार आहे. संत मुक्ताबाईंची पालखी आज जालना येथून शहरातुन मार्गक्रमण करणार आहे. या दरम्यान शहरातील पांजरापोळ गो रक्षण मंडळाकडून दिंडीला दुपारचे जेवण दिले जाणार आहे. त्यांनतर दिंडीचे मुक्कामाचे ठिकाण जालना शहराजवळच असणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Ashadhi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान; कसा आहे दिनक्रम अन् कुठे आहे मुक्काम? वाचा सविस्तर