Ashadhi Wari 2022 : अखंड महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतो. तो क्षण म्हणजे आषाढी वारीचा पायी सोहळा. अन् अखेर हा क्षण आता येऊन ठेपलाय. जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी तर उद्या देहूनगरीतुन प्रस्थान करणार आहे. या पालखीचं यंदाचं हे 337 वे वर्ष आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे वारकरी संप्रदाय या सोहळ्याला मुकला. मोजक्याच वारकऱ्यांमध्ये ही परंपरा जोपासण्यात आली, पण पायी वारीत खंड पडला. यंदा कोरोना ओसरल्याने पायी वारी होतेय. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मात्र, पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे वातावरणही निर्माण झालेत.
संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीत वारकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. सोमवारी 20 जूनला पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार असल्याने देवस्थान ही सज्ज झालं आहे. गेली दोन वर्ष कोरोनामुळे या वारकऱ्यांना ना देहूत, ना विठूरायाच्या पंढरीत जाता आलं. शासनाच्या निर्बंधांमुे पायी वारीत खंड पडला आणि पालखी मंदिरातच मुक्कामी राहिली. आषाढी एकादशीला फक्त पादुकाच विठूरायाच्या भेटीला गेल्या होत्या. ही दोन वर्ष वारकऱ्यांना घरी बसूनच नामस्मरण करावं लागलं. यामुळे वारकऱ्यांना पायी सोहळ्यातून मिळणारी ती ऊर्जा काही मिळाली नाही. म्हणूनच यंदा वारकरी गेल्या दोन वर्षांची कसर भरून काढायला सज्ज झाला आहे. हा 337 वा सोहळा 'न भूतो, न भविष्यते' असा पार पडेल. आत्तापर्यंतंचे सर्व उच्चांक मोडेल, असा विश्वास असल्याने तशी तयारी ही करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत निसर्गाने अवकृपा दाखवली आहे. जून महिना निम्मा सरून ही पावसाने ओढ दिलेली आहे. त्यामुळे या वारकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. हा वारकरी अर्थात शेतकरी पेरण्या उरकूनच वारीत दाखल होतो. म्हणूनच वारकरी संप्रदाय विठूरायाच्या चरणी पावसाचं साकडं घालतोय. सोमवारच्या प्रस्थानानंतर पाऊस कृपादृष्टी दाखवेल अन् वारकऱ्यांच्या पेरण्या उरकतील. प्रस्थानाला थोडी गर्दी कमी असेल पण पुण्याच्या बाहेर पालखी पडताच वारकऱ्यांचा अलोट पहायला मिळेल. असा विश्वास व्यक्त केला जातोय.
सोमवारी दुपारी अडीच वाजता पालखी प्रस्थान सोहळा पार पडेल. पहिला मुक्काम हा देहूतील मुख्य मंदिरामागे असणाऱ्या ईनामदार वाड्यात असेल. तिथून पालखी आकुर्डी, पुणे, लोणी मार्गे, बारामती मार्गे 2 जुलैला इंदापूरला पोहचेल. मग तिथून पुढं अकलूज, पिराची कुरोली मार्गे 8 जुलैला वाखरी मध्ये मुक्काम करेल. पंढरपूरच्या संत तुकाराम महाराज मंदिरात 9 जुलैला मुक्काम आणि 10 जुलैला आषाढी एकादशी दिवशी विठूरायाची भेट घडेल.
महत्वाच्या बातम्या :
- Ashadhi Wari 2022 : संत तुकोबा आणि नामदेवांच्या पालखीनिमित्त चोख पोलिस बंदोबस्त,1800 पोलिस कर्मचाऱ्यांसह पालखीचे प्रस्थान
- Ashadhi Wari 2022 : संत नामदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना; हिंगोलीत वारकऱ्यांचा भव्य रिंगण सोहळा
- गजानन महाराजांच्या पालखीचं प्रस्थान; 700 भाविक 5 जिल्हे, 750 किमी अंतर पार करत आषाढीला पंढरपुरात पोहचणार