Ashadhi Wari 2022 Live : बारा लाखापेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल; पाहा यात्रेचे प्रत्येक अपडेट्स

Ashadhi Wari 2022 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरी सजली असून वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पाहा आषाढीचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Jul 2022 03:13 PM
आषाढी एकादशीनिमित्त नवी मुंबईत भव्य दिंडी यात्रेचे आयोजन.

आषाढी एकादशी निमित्त आज नवी मुंबईतील सानपाडा येथे भव्य दिंडी यात्रा काढण्यात आली. नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा करत या दिंडी यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. विठ्ठल रुकमिणीची पालखी काढत संपूर्ण सानपाडा विभागात ही दिंडी यात्रा काढण्यात आली. वाजत गाजत विठ्ठल नामाच्या गजरात संपूर्ण देव भूमी या दिंडी यात्रेत सहभागी झाली होती. ज्या नागरिकांना प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नाही अश्या भक्तांसाठी ही दिंडी एक पर्वणी ठरली. यावेळी दिंडीत उपस्थित कलाकारांनी विठ्ठलाच्या जयघोषात तल्लीन होत विविध मनमोहक कलाकृती सादर केल्या ज्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हिंगोलीच्या दारव्हेकर दाम्पत्याने साकारली पांडुरंगाची रांगोळी





हिंगोलीच्या आखाडा बाळापूर येथील दिलीप दारव्हेकर आणि शीतल दारव्हेकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून रागोळीतून साक्षात पांडुरंगाची मूर्ती साकारली आहे आणी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन आपल्या घरीच घेतलंय. दरवर्षी आषाढी निमित्ताने महिनाभर हे दाम्पत्य  आपल्या कलेच्या माध्यमातून माझी चित्रवारी या वारीतील वेगवेगळ्या वारकऱ्यांच्या वेशभूषा आणि प्रसंग या चित्राच्या माध्यमातून दरवर्षी साकारतात 


 

 



 


नाशिकच्या सिडको परिसरातील विठ्ठल रुखमाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

यंदा कोरोना निर्बंधमुक्त आषाढी एकादशी साजरी होत असून राज्यातील विठ्ठल मंदिरं भाविकांच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. नाशिकच्या सिडको परिसरातील विठ्ठल रुखमाई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय, भर पावसात भाविक मंदिरात दाखल होत असून विठुरायाचं मनोभावे ते दर्शन घेतायत.

पालघर : आषाढी एकादशीच्या दिवशी पालघरमधील उमरोळी दुमदुमली

पालघर : आषाढी एकादशीच्या दिवशी पालघरमधील उमरोळी दुमदुमली, आषाढी एकादशीच्या निमित्ताने उमरोळी मध्ये बाळ गोपाळ महिला तरुण-तरुणी वयोवृद्ध एकत्र येऊन वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करत नूतन विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थी, गावकरी यांनी दिंडी काढून खेळ आणि फुगडी खेळत पालखी काढून आषाढी एकादशी आनंदाने साजरी करण्यात आली 

चित्रकार हर्षद मेस्त्रीने मातीच्या विटेवर विठुराया, संत नामदेव महाराज आणि संत गोरा कुंभार यांची चित्र साकारली

आषाढी एकादशी निमित्ताने सिंधुदुर्गातील कुडाळमधील चित्रकार हर्षद मेस्त्री याने मातीच्या विटेवर विठुराया, संत नामदेव महाराज आणि संत गोरा कुंभार यांची चित्र साकारली आहेत. संत गोरा कुंभाराने युगे अठ्ठावीस विटेवरी पंढरीच्या पांडुरंगाला उभं केलं त्याचं विटेवर पांडुरंग, संत नामदेव महाराज आणि संत गोरा कुंभार यांची चित्र साकारली आहेत. विशेष म्हणजे एकदा विठ्ठलाचं चित्र पाहिलं आणि वीट परतली तर संत नामदेव महाराजाचं दर्शन होते तर पुन्हा वीट परतल्यास संत गोरा कुंभाराचं चित्र दिसत. ही आकर्षक आणि आगळीवेगळी कलाकृती हर्षद मेस्त्री यांनी साकारली असून त्यांना ही चित्र काढण्यासाठी दोन ते तीन तास लागले.

शिर्डी आषाढी एकादशी निमित्त साई प्रसादलयात 11 टन साबुदाणा खिचडीचा प्रसाद

आज आषाढी एकादशी निमित्त शिर्डीत साईदर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी साई प्रसादालयात खास साबुदाणाच्या महाखिचडीचा प्रसाद देण्यात आलाय.. तब्बल 11 ते 12  टन साहित्याचा वापर यासाठी करण्यात आलाय. साई समाधीवर विठ्ठलाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. साई मुर्तीला करोडो रुपयांच्या सोन्याच्या अलंकार आणि तुळशीमाळांचा साज सुद्धा चढवण्यात आलाय... पंढरपूरप्रमाणे साईंना विठ्ठल स्वरूप मानत हजारो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत...

वारकरी सन्मान व एसटी मोफत पास वितरण

आजच्या शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मानाच्या वारकऱ्यांना राज्य परिवहन  महामंडळाकडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत पासचे वितरणही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी एसटी महामंडळाचे वाहतूक महाव्यवस्थापक सुजय जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड व विभाग नियंत्रक विलास राठोड उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते 'रिंगण' या वारी विशेषांकाचे प्रकाशन देखील याप्रसंगी करण्यात आले.

निर्मल दिंडी पुरस्कार वितरण

पंढरीची वारी ही महाराष्ट्राची प्राचीन आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन 'निर्मल वारी हरित वारी ' अभियानामध्ये नागरिकांचा  सहभाग वाढवावा या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यामार्फत 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कार  देण्यात येतो.  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री संत तुकाराम महाराज कोकण दिंडी पनवेल जिल्हा रायगड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक-वै.ह भ. प. भाऊसाहेब महाराज खरवळकर दिंडी, मु.पो.शेरा, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर  (७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री संत जगनाडे महाराज दिंडी घोटी बुद्रुक जिल्हा नाशिक (५० हजार व सन्मान चिन्ह) दिंडीला प्रदान करण्यात आले. तसेच 'ग्रीन बिल्डिंग' पुरस्काराचे वितरणही या वेळी करण्यात आले.

धुळे शहरातील मालेगाव रोडवरील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी

आषाढी एकादशीनिमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रतिबंधामुळे भाविकांना दर्शन घेता येणे शक्य नव्हते मात्र यंदा निर्बंध क्षितिज झाल्यानंतर प्रथमच आषाढी एकादशी साजरी होत आहे शहरासह जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून पावसाची संततधार सुरू आहे मात्र भर पावसात देखील भाविकांची दर्शनासाठी गर्दी कायम असल्याचे दिसून आले मंदिर परिसरात विविध व्यवसायिकांनी दुकाने थाटली असून मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा होऊन विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झालेत, शहरातील मालेगाव रोडवरील हे विठ्ठल मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून अत्यंत प्राचीन असलेल्या या मंदिरात दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो, मंदिर परिसरातून आढावा घेतला आहे  

प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या पळशीत भाविकांची मांदियाळी 


 

















अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील पळशीची प्रतिपंढरपूर अशी ओळख आहे...आषाढी एकादशी निमित्ताने येथील पांडूरंग मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय... दरवर्षीप्रमाणे सुजित झावरे यांच्या हस्ते पांडुरंगाची महापुजा करण्यात आली...पळशी येथील पांडुरंगांच्या दर्शनासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने दिंड्या येत असतात... सायंकाळ पर्यंत जवळपास 50 हजार वारकरी येथे दर्शनासाठी येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितलंय... प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेले पळशी येथील विठ्ठल मंदीर हे हेमांडपंथी पध्दतीचे असून मंदिरात विठुरायासह रुक्मिणीमाता तसेच संत तुकारामांची मूर्ती आहे... पहाटे २ वाजल्यापासूनच मंदिर हे दर्शनासाठी खुले करण्यात आले असून दिवसभर भजन , कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम येथे होणार आहेत.

 














इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर: इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह  महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसरातील भुवैकुंठ प्रकल्प आणि श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिराच्या भूमिपूजन  प्रसंगी ते बोलत होते.यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, लोकनाथ स्वामी महाराज, श्रीकृष्ण चैतन्य स्वामी, सुंदर चैतन्य स्वामी, श्री.प्रल्हाद दास, भक्तीप्रेम स्वामी, कृष्णकांत दास आदि उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, विश्व बंधुत्व,ऐक्य, एकता, सहिष्णूता, शांती निर्माण करण्यासाठी भुवैकुंठ  माध्यम ठरेल. इस्कॉनच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या अन्नछत्र व्यवस्थेचा भाविक मोठ्या प्रमाणत लाभ घेतात. १५ एकर जागेत भव्य दिव्य मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. यामध्ये गुरुकुल शिक्षण पद्धती, बाल संस्कार वर्ग, अन्नछत्र, गोशाळा संवर्धन, संशोधन, भक्त निवास,असे विविध उपक्रम होणार आहे.  मंदिर परिसर विकासासाठी राज्य शासन आवश्यक सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या जनतेचा सेवा करण्याची संधी मिळाली असून सेवक म्हणून काम करणार आहे.  राज्याला सुजलाम सुफलाम करुन विकासाकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी मंदीर परिसरातील प्रभुपाद घाटाची पाहणी केली.

Ashadhi Wari 2022 : धुळे शहरातील मालेगाव रोडवरील प्राचीन विठ्ठल मंदिरात भर पावसातही भाविकांची दर्शनासाठी गर्दी

आषाढी एकादशीनिमित्त धुळे शहरातील मालेगाव रोडवरील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रतिबंधामुळे भाविकांना दर्शन घेता येणं शक्य नव्हतं, मात्र यंदा निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रथमच आषाढी एकादशी साजरी होत आहे. शहरांसह जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली असून पावसाची संततधार सुरू आहे. मात्र भर पावसात देखील भाविकांची दर्शनासाठी गर्दी कायम असल्याचं दिसून आलंं आहे. मंदिर परिसरात विविध व्यवसायिकांनी दुकानं थाटली असून मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं आहे. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा होऊन विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले आहेत. शहरातील मालेगाव रोडवरील हे विठ्ठल मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून अत्यंत प्राचीन असलेल्या या मंदिरात दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उत्सव साजरा केला जातो. 

Virar : विरारमध्ये आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी

Virar News : आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रूक्मिणीच्या जयघोषात आज विरारमध्ये दिंडी काढण्यात आली आहे. या दिडींत माऊली माऊलीचा गजर करीत, महिला, पुरुष, लहान बालक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. दिंडीतील रथात साक्षात विठ्ठल-रूक्मिणी  साकारण्यात आली होती. हे विठू रुखमाई सर्वांचे लक्ष आकर्षित करत होते. विरार पूर्व गास कोपरी पासून निघालेली दिंडी ही साईनाथ, गणपती मंदिर मार्गे नारंगी गावाच्या विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली होती. 

औरंगाबाद शहराजवळील वरुड काझी नावाच्या गावात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन

औरंगाबाद शहराजवळील वरुड काझी नावाच्या गावात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन पाहायला मिळालं. आज आषाढी एकादशी आणि बकरी ईद आहे मात्र, गावातील मुस्लिम बांधवांनी आज कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला .मुस्लिम बांधव आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेल्या दिंडीमध्ये सहभागी झाले. आणि फुगडी खेळण्याचा आनंदही घेतला. या गावांमध्ये गेली वर्षानुवर्ष हिंदू मुस्लिम एकमेकांच्या सणांमध्ये उपस्थिती लावून एकतेचे दर्शन घडवतात..

शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल
शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल होताहेत.आज आषाढी एकादशी आणी नंतर गुरूपोर्णीमेच्या निमित्ताने शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल होताहेत.. साईनामाचा जयघोष करत पुण्याहून निघालेली मानाची पायी पालखी शिर्डीच्या वेशीवर पोहोचलीय...आज आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भक्त विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरीत दाखल झालेले आहेत.. तर दुसरीकडे शिर्डी माझे पंढरपूर म्हणत शेकडो पायी पालख्या शिर्डीत साईदर्शनासाठी दाखल होताहेत.. पुण्याहून निघालेली साईसेवा भक्त मंडळाची पालखी शिर्डीत दाखल होत आहे.. हातात विना, महिलांच्या डोक्यावर तुळशी आणी साईनामाचा गजर करत हे सर्व भक्त साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचताहेत.. आषाढी एकादशीचा शिर्डीतही मोठा उत्साह असतो.. आजच्या दिवशी साईसमाधीवर विठूरायाच्या फोटोची पुजा केली जाते तर साईबाबांना सुवर्ण आभुषणांसह तुळशीपत्राची माळ घातली जाते.. 

 
Ulhasnagar : आषाढी एकादशी निमित्त सुप्रसिद्ध बिर्ला मंदिरात भक्तांची मांदियाळी

Ulhasnagar News : विठ्ठल राखुमाईच्या नावाचा जयघोष आणि टाळ मृदुंगामुळे संपूर्ण वातावरण भक्तीमय झाले आहे. आज आषाढी एकादशी निमित्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उल्हासनगर जवळील बिर्ला मंदिरात विठ्ठल रुक्माईची पूजा करण्यात आली. ‘जिथे कंपनी तिथे एखादे मंदिर’ बिर्ला उद्योग समूहाचं हे वैशिष्ट्य आहे. सेंच्युरी कंपनीच्या आवारात बिर्ला व्यवस्थापनाने भव्य विठ्ठल मंदिर उभारले आहे. विठ्ठल राखुमाईचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या विविध भागातून इथे भाविक येत असतात. विशेषत: आषाढी एकादशीला आणि कार्तिकीला पंढरपूरला ज्यांना जाता येत नाही असे भाविक आणि वारकरी या मंदिरात येऊन विठू माऊलीचे दर्शन घेतात. उल्हासनगरचे बिर्ला मंदिर अतिशय देखणे असून विविध कलाकुसर अत्यंत बारकाईने या मंदिरात करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना या मंदिरा बाबत आस्था असून आकर्षण देखील आहे. 

पुसदमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलरुक्मिणीची महापूजा वेदोक्त मंत्रोच्चारात संपन्न

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुसद येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्याने  सकाळी विठ्ठलाची  महापूजा पहाटे संपन्न झाली. या वेळी दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली. मंदिराचे विश्वस्त बिपिन चिद्दरवार यांचे सह पुजारी महाराज  यांची प्रमुख उपस्थिती होती तर या वेळी वेदोक्त मंत्राच्या जय घोषात मधुसूदन महाजन आणि  दीपक आसेगवकर यांचे हस्ते पूजा  करण्यात आली.  पहाटेच्या नंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले असून आजूबाूलाचे परिसरातील नव्हे तर जिल्ह्याच्या विविध भागातून हजारो भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेत आहे.

Pandharpur Live : बारा लाखापेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल

 आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये 12 लाखापेक्षाही जास्त विठ्ठल भक्त पोहोचले आहेत..प्रथेप्रमाणे विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली..विठ्ठलाचा गाभाऱ्यातून दर्शन घेण्यासाठी रांगेमध्ये थांबलेल्या विठ्ठल भक्तांची रांग इतकी मोठी झाली आहे की दर्शन रांगेमध्ये लागलेल्या व्यक्तींना दर्शनासाठी 24 तासाचा अवधी लागत आहे.. 

Sindhudurg News : तळकोकणातील तिलारी खोऱ्यात कल्पवृक्षाच्या पाना; फळांनी साकारला विठुराया

Sindhudurg News : निसर्गसौंदर्यानं नटलेल्या कोकणातील दोंडामार्ग येथील केर आणि मोर्ले या गावातील स्त्रियांनी एकत्र येऊन कल्पवृक्षाच्या पांनाचा आणि फळांचा वापर करून विठुराय साकारला आहे. या अनोख्या निसर्गवारीतून त्याचे निसर्गाबद्दल असलेले प्रेम आणि चराचरात त्यांना दिसणारा विठ्ठल यांचे साक्षात दर्शन घडवलं आहे. कल्पवृक्ष म्हणजेच, नारळाच्या झाडापासून विठुराया साकारला आहे. निसर्गाच्या सानिध्यात मोकळ्या माळरानावर नारळाच्या पानांपासून तसेच फळांपासून हा विठुराया साकारण्यात आला आहे. नारळाच्या झाडाच्या मुळापासून शेंड्यापर्यत सर्वच भागाचा उपयोग होतो. त्यामुळे नारळापासून माळरानावर विठुराया साकारण्यात आला आहे. 



न्यू व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशी आणि बकरी ईद साजरी  
आज आषाढी एकादशी आणि इद एकाच दिवशीं असल्याने न्यू.व्हिजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी आणि बकरी ईद उत्साहात साजरी केली. वारकरी पेहराव आणि टाळ मृदुंग हातात घेउन विठ्ठलाचा जयघोषात छोट्या वारकऱ्यांनी एकादशी साजरी केली..विशेष म्हणजे यात मुस्लिम बांधव ही सहभागी झाल्याने इथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवून आले.

 
आषाढी एकादशीनिमित्त गेवराईच्या संतोष घसिंग यांचा अभंग

आषाढी एकादशीनिमित्त गेवराईच्या संतोष घसिंग यांचा अभंग


आषाढाची चंद्रभागा, पासोडीकाठी पोहते
विठोबाच्या डोळ्यामध्ये, अभंगवाणी वाहते


पंढरीच्या विठ्ठला, तूझा जन्मोजन्मी धाक
अभंगाच्या राखेतून, आली विठ्ठलाची हाक


ओंजळीत अर्घ्यदान, चंदनाचे गंधपाणी
टाळचिपळ्यांचे संगे, रमली नाम्याची जनी


ओघळून आषाढाच्या,  नद्या धावल्या किती 
चंद्रभागेच्या टिळ्यात ,विठोबाची काळी मूर्ती


विटेवर उभा देव, वारकऱ्यांचा भक्त
डोळ्यातल्या गाभाऱ्यात, कुंभाराचा काला फक्त


घनगर्द आषाढात, आली एक एकादशी
पंढरीच्या वाटावर, वारकऱ्यांची काशी


फुगडीत रिंगणाच्या, मुंग्यापरि वारकरी
परतीच्या पावलांना, रुक्मिणीची भाकरी 


 पंढरीच्या विठोबाचे, माहेर खरे कोणते
टाळ मृदंगात दंग, काही अभंग जाणते


अभंगाने ओलावला, चंद्रभागेचा पान्हा
एकादशीला माऊली, बोलावते कशी पुन्हा


विठ्ठलाच्या भूमीत, किती आले राजा संत
पावसाळ्यात भिजले, देवाघरचे महंत


किती वारकरी आले, भूमितून वरवर
तुकोबांच्या अभंगाचे, पंढरीत एक घर


विठ्ठलाच्या विटेखाली, वारकऱ्यांचा पसारा
अभंगाच्या तालावर, नाचतो उनाड वारा


आषाढी एकादशीला, जनाईचा उपवास
पावसातला विठोबा, अभंगाचा ओला भास


 

कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा

आधी नंदापूर आणि मग पंढरपूर असे म्हटले जाते. त्याच कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा पाहायला मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ म्हणजे प्रति पंढरपूर मानले जाते. त्यामुळे या आषाढी एकादशीला भाविकांनी मोठी गर्दी केली...ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक याठिकाणी येऊन पांडुरंगाचे दर्शन घेतात.




आषाढी एकादशीचा उत्साह पंढरपूरसह संपूर्ण राज्यात

आज आषाढी एकादशीचा उत्साह पंढरपूरसह संपूर्ण राज्यात आहे.पुण्यातही प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या सिहगड रोडवरील मंदिरात आज पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.या मंदिराच्या बाहेर भाविक मोठ्या संख्येन रांगेत उभा राहून दर्शन घेत आहेत.गेले दोन वर्षे कोरोना होता.त्यामुळे मंदिर बंद होती आषाढी एकादशी ही झाली नव्हती त्यामुळं यावर्षी आषाढी एकादशीचा साजरी होते.पुण्यातील या मंदिरांला फुलांची आणि लायटिंग सजावट करण्यात आली आहे...

मुंबईतील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांचा उत्साह
आज मुंबईतील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांचा उत्साह  पाहायला मिळतो. मध्यरात्री 3 वाजल्यापासून भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आलाय...मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पहाटे 4 वाजता महापूजा आरती झाली.भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाने अगदी भक्तिमय वातावरणात भाविक मंदिरात येऊन दर्शन घेतायेत. दोन वर्षानंतर भाविकांचा उत्साह मुंबईतल्या प्रतिपंढरपूर असलेल्या वडाळा मंदिरात पाहायला मिळतोय

 
औंढा नागनाथ येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात पूजा आमदार संतोष बांगर यांनी सपत्नीक केली पूजा

हिंगोली जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या औंढा नागनाथ या ठिकाणी विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी पत्नीसोबत विठ्ठल रुक्माईची पूजा केली. नागनाथ देवस्थानचे अध्यक्ष तहसीलदार कृष्णा कानगुले यांनी सुद्धा यावेळी विठ्ठल रुक्माईची पूजा केली 

कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा वारकऱ्यांना विठुरायाचे थेट दर्शन

कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा भाविकांना आणि वारकऱ्यांना त्यांच्या विठुरायाचे थेट दर्शन घेता येणार आहे. विठूरायाला डोळे भरून पाहण्यासाठी सगळेच भाविक आतुर झाले आहेत. लाखोंच्या संख्येने लोक आज पंढरपुरात आले आहेत. दिंडी, वारी, विठुरायाची भजनं, अभंगांनी आज मंदिराचा परिसर दुमदुमला आहे.

विठुरायाच्या पूजेनंतर मुख्यमंत्र्यांचा पुढील कार्यक्रम


विठूरायाची पूजा संपन्न झाल्यानंतर पहाटे 5.30 वाजता - पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमीपूजन


पहाटे 5.45 वाजता - पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे नदीघाटाचे लोकार्पण


सकाळी 11.15 वाजता - शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ


सकाळी 11.45 वाजता- पंचायत समिती, पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप कार्यक्रम


 





 

मुख्यमंत्री सहकुटुंब हजर

विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली आहे. यावेळी मुख्यमंत्री कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ शकणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या काही अटी-शर्थींवरचा पूजेची परवानगी देण्यात आली होती.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या नवले दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. गेली 20 वर्ष शेती करून आपल्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या नवले कुटुंबात 1987पासून वारीची परंपरा सुरु आहे. मुरली नवले हे दरवर्षी न चुकता सलग वारी करत आहेत. तसेच, ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातही गेल्या 12 वर्षांपासून पायी वारी करत आहेत.

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची महापूजा

Ashadhi Ekadashi 2022 : आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) आहे. याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.

पार्श्वभूमी

Ashadhi Ekadashi 2022 : आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) आहे. याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. गेली 20 वर्ष शेती करून आपल्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या नवले कुटुंबात 1987पासून वारीची परंपरा सुरु आहे. मुरली नवले हे दरवर्षी न चुकता सलग वारी करत आहेत. तसेच, ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातही गेल्या 12 वर्षांपासून पायी वारी करत आहेत.


मुख्यमंत्री सहकुटुंब हजर


विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली आहे. यावेळी मुख्यमंत्री कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ शकणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या काही अटी-शर्थींवरचा पूजेची परवानगी देण्यात आली होती.


विठुरायाच्या पूजेनंतर मुख्यमंत्र्यांचा पुढील कार्यक्रम


विठूरायाची पूजा संपन्न झाल्यानंतर पहाटे 5.30 वाजता - पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमीपूजन


पहाटे 5.45 वाजता - पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे नदीघाटाचे लोकार्पण


सकाळी 11.15 वाजता - शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ


सकाळी 11.45 वाजता- पंचायत समिती, पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप कार्यक्रम


कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा भाविकांना आणि वारकऱ्यांना त्यांच्या विठुरायाचे थेट दर्शन घेता येणार आहे. विठूरायाला डोळे भरून पाहण्यासाठी सगळेच भाविक आतुर झाले आहेत. लाखोंच्या संख्येने लोक आज पंढरपुरात आले आहेत. दिंडी, वारी, विठुरायाची भजनं, अभंगांनी आज मंदिराचा परिसर दुमदुमला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.