Ashadhi Wari 2024 : तब्बल 20 दिवसांच्या शिणवट्यानंतर आज प्रक्षाळ पूजेनंतर देवाच्या राजोपचाराला सुरुवात होत असून देवाचा पलंग बसविल्याने देवाला आता रोज निद्रा घेता येणार आहे. आषाढी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना विठुरायाचे दर्शन घेता यावे यासाठी 7 जुलै रोजी देवाचा पलंग काढून 24 तास दर्शन देत विठुराया उभा होता. आज प्रक्षाळपुजेनंतर पुन्हा देवाचे राजोपचार सुरु झाले असून आजपासून 24 तास सुरु असलेली दर्शन व्यवस्था बंद झाली आहे. 
      प्रक्षाळ पूजा म्हणजे प्रक्षालन करणे म्हणजेच सफाई करणे होय. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. आषाढी आणि कार्तिकी या दोन मोठ्या यात्रेनंतर ही प्रक्षालळ पूजा होत असते. यंदा आषाढीला जवळपास 18 ते 20 लाख भाविक आल्याने गेले 20 दिवस देव रात्र-दिवस भाविकांना दर्शन देत उभा होता. यामुळे देवाला आलेला शिणवटा घालवण्यासाठी सकाळी देवाला पहिले गरम पाण्याचे स्नान घालण्यात आले. यानंतर देवाच्या पायाला आलेला थकवा घालवण्यासाठी भाविकांनी देवाच्या पायाला लिंबू आणि साखर चोळून दर्शन घेतले. यासाठी देवाच्या पायावर चांदीचे कवच लावण्यात आले होते.
    आषाढी यात्रे दरम्यान पंचमीपासून पुढे जवळपास 20 दिवस यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन देता यावे यासाठी देवाचा पलंग काढला जातो ज्यामुळे देव झोपत नाही अशी भावना यात असते. यावेळी देवाचे सर्व नित्योपचार बंद करून केवळ रोजची नित्यपूजा, नैवेद्य, पोशाख आणि संध्याकाळी लिंबूपाणी याचसाठी दर्शन थोड्या काळासाठी बंद असते. या 20 दिवसांत देव झोपत नसल्याने मंदिरही 24 तास उघडे असते. काल रात्री मंदिर समितीच्या वतीने देवाच्या सर्वांगाला तिळाच्या तेलाने चोळून मालिश करण्यात आली. आज दुपारी बारा वाजता देवाच्या पायाला लिंबू आणि साखर चोळून देवाचे अंग मोकळे करण्याची प्रथा पूर्ण केल्यावर देवाला गरम पाण्याने स्नान घालण्यात आले. यानंतर विठुरायाला रुद्रा अभिषेक करण्यात आला. याच पद्धतीने रुक्मिणी मातेकडे देखील अभिषेक करण्यात आला. यावेळी विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. यानंतर देवाला पंचपक्वान्नांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. संध्याकाळी पोषाखाचेवेळी देवाला ठेवणीतील वस्त्रे आणि पारंपरिक दागिन्याने सजविण्यात येणार आहे. 
    याचवेळी विठुरायाच्या पलंग पुन्हा देवाच्या शेजघरात नेण्यात येऊन त्यावरील गाद्या, लोड बदलण्यात आले. आज रात्री शेजारती नंतर विठुराया निद्रेसाठी जाणार असून त्यापूर्वी त्याला 21 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींच्या काढ्याचा नैवेद्य दिला जातो. आजच्या प्रक्षाळपुजे पासून आता देवाचे सर्व नित्योपचार सुरु झाले आहेत. 


हेही वाचा :


Pune Rain: पुण्यात आर्मी... पावसाचा हाहाकार, पूर पीडितांच्या मदतीसाठी 85 जणांची टीम तैनात