मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्याचा कारभार हाती घेतला. तेव्हापासून आतापर्यंत त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत आहे, सर्वांना हे दिसत आहे, मात्र बॉलिवूडचा अभिनेता अरशद वारसीने याबाबत ट्विटरवर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच एवढी संकटं आली आहेत. त्यावर अरशद वारसीने केलेलं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालं असून, अनेकांनी यावर कमेंट केल्या आहेत.





अरशद वारसीने आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं की, "मला नाही वाटत कोणत्याही मुख्यमंत्र्याला त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या कार्यकाळातच एवढ्या संकटांचा सामना करावा लागला असेल, जेवढा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करावा लागतोय. मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या कार्यालयात स्थिरस्थावर होत होते की, कोरोना व्हायरससारख्या महामारीचा सामना करावा लागला आणि आता चक्रीवादळ."


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कौतुकाचं अरशदने केलेलं हे ट्वीट व्हायरल होत आहे. अनेकजण यावर रिट्वीट करत आपली प्रतिक्रिया देत आहेत. अरशद वारसी अभिनयाशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपले सामाजिक विचार व्यक्त करत असतो.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही महिन्यातचं कोरोना महामारीचं संकट राज्यात आलं. गेल्या तीन महिन्यांपासून राज्य या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. त्यात आज निसर्ग वादळाचा राजाच्या समुद्रकिनारी भागाला तडाखा बसला. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे फार नुकसान झालं नाही. मात्र मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या समोरील आव्हानं कमी होताना दिसत नाहीत.


संबंंधित बातम्या




CM Uddhav Thackeray | देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा समावेश, आयएएनएस आणि सी व्होटरचा संयुक्त सर्व्हे