उस्मानाबाद : निरक्षर व्यक्तीची शिपाई पदावर नेमणूक करून तब्बल दहा वर्षे त्याचा पगार लाटलेल्या मुख्याध्यापकाचा आणखी एक कारनामा पुढे आला आहे. कळंब तालुक्यातील देवळाली गावच्या जागृती माध्यमिक शाळेच्या संस्थाचालकाने आपल्या पत्नीची 2004 ला शाळेवर मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती केली. परंतु, या मुख्याध्यापक पत्नीने 2007 ला बीएडचे शिक्षण पूर्ण केले आहे. संस्थाचालकाच्या या कारनाम्यांमुळे आता या प्रकरणातील अनेक खुलासे समोर येत आहेत.
बीएड होण्याआधी तीन वर्षे पत्नीला मुख्याद्यापक करणाऱ्या या संस्थाचालकाने 26 शिक्षकांचे पगार स्वत:च्या बॅंक खात्यावर वळवल्याचीही माहिती उघड झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व करण्यासाठी संबंधित संस्थाचालकाला चक्क शिक्षण अधिकाऱ्यानेच मदत केल्याचे समोर आले आहे. या 26 शिक्षकांचा तब्बल 26 महिन्यांचा पगार या संस्थाचालकाने आपल्या खात्यावर वळवला आहे.
संबंधित संस्थाचालक एवढेच करून थांबला नाही तर शासनाकडून शाळेचे क्रिडांगण बनवण्यासठी आलेला 24 लाख रूपयांचा निधीही लाटला आहे. 24 लाख रूपये शासनाकडून घेतले. परंतु, प्रत्यक्षात मैदानच बनवले नाही. शिवाय पीण्याच्या पाण्यासाठी शासनाकडून 7 लाख रूपयांचा निधी आला. परंतु, संस्थाचालकाने 500 रूपयांची पाण्याची टाकी आणून बसवली. याबरोबरच सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचा फी परतावा आज पर्यंत या संस्थाचालकाने दिलेला नाही.
काय घडले होते आधी?
देवळाली गावच्या जागृती माध्यमिक शाळेच्या संस्थाचालकाने आपल्या शेतातील अंगठाबहाद्दर साल गड्याला शिपाई पदावर दाखवले. त्यातून त्याचा दहा वर्षाचा पगार या संस्थाचालकाने लाटला आहे. संस्थाचालकाचा हा कारनामा पुढे आल्यानंतर आता त्याचे एक-एक कारनामे पुढे येत आहेत.
गुणवंत राऊत या निरक्षर व्यक्तीची संस्थाचालकाने शाळेत शिपाई म्हणून नियुक्ती केली. गुणवंतराव शेतात सालगडी असूनही शिक्षणाधिकाऱ्यांकडून त्याच्या नियुक्तीला मान्यता दिली. ही शाळा 2016 ला 20 टक्के अनुदानित झाली. तेव्हापासून नोव्हेंबर 2020 पर्यंत राऊत यांचे 20 टक्के वेतन उचलल्याचे राऊत यांनाही माहीत नाही, अशी माहिती स्वत: गुणवंत राऊत यांनी दिली दिली आहे.
नोव्हेंबर 2020 पासून शाळेला 40 टक्के अनुदान सुरु झाले. त्याप्रमाणे राऊत यांच्या नावे वेतन उचलले गेले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गटनेते महेंद्र धुरगुडे यांनी प्रश्न विचारल्यानंतर चौकशी समितीचे गठन झाले. समितीने केलेल्या चौकशीत गुणवंतराव शेतात काम करताना दिसले.
महत्वाच्या बातम्या
- इंग्रजीच्या भीतीनं साताऱ्यात विद्यार्थीनीची आत्महत्या तर कोल्हापुरात शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या
- Palghar: आर्थिक चणचणीला कंटाळून युवक-युवतीची आत्महत्या, पालघर जिह्यातील घटनेनं खळबळ
- मुंबईसह राज्यातील कोरोना परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात, मुंबई महापालिका आणि राज्य सरकारकडून हायकोर्टात आश्वासन