जालना : आंतरवाली सराटी (Antarwali Sarathi Lathicharge) येथील उपोषणास्थळी झालेल्या दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे यांनी एक गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वी माझ्या गाडीत पिस्तुल नव्हते, मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर गाडीत पिस्तुल कोठून आले मला देखील माहित नसल्याचं बेदरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांनीच आपल्याला पिस्तुल प्रकरणात अडकवल्याचे अप्रत्यक्षरित्या बेदरे यांनी आरोप केला आहे. 


दरम्यान याबाबत बोलतांना बेदरे म्हणाले की, "मी राजकारण विरहित मराठा समाजाचा समाजकारण करतो. मी बीडच्या गेवराई तालुक्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालो होतो. त्यातूनच पोलिसांनी मला अटक केली आणि माझ्यावर आंतरवाली सराटी येथील दगडफेकीचा आरोप लावला. माझ्याकडे पिस्तूल सुद्धा नव्हते ते पोलिसांच्या गाडीतूनच देण्यात आल्याचा" आरोप बेदरे यांनी केला आहे. 


तसेच, माझे शरद पवार साहेबांसोबत आणि नितेश राणे यांच्यासोबत फोटो आहेत. पण या आंदोलनाचा आणि त्यांचा कोणताही संबंध नाही. मी समाजकारण करत असताना राजकारण विरहित समाजकारण करतो. मला पोलिसांनी अटक केल्यानंतर माझा मोबाईल आणि माझी गाडी ही पोलिसांच्या ताब्यात होती. त्यामुळे माझ्या गाडीमध्ये हे पिस्तूल कोणी ठेवले? हे मला माहित नाही, असेही बेदरे म्हणाले.