वर्धा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत, तर काही शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरु आहेत. त्यामुळे बहुतांश घरी मुलं मोबाईलं हाताळताना दिसतात. गेम, कार्टून पाहण्यासोबतच नाही म्हटलं तरीही ऑनलाईन शिक्षणासाठीदेखील मुलांच्या हातात मोबाईल आहेतच. पण मुलांच्या हाती मोबाईल असताना मुलांकडून आरोग्य सेतू अ‍ॅप वापरणं एका कुटुंबाला तापदायक ठरलं आहे. अरॅपवर दिलेल्या माहितीमुळे कुटुंबाला विलगीकरणात राहावं लागलं आहे.


वर्ध्याच्या आर्वीमध्ये एका कुटुंबाला या प्रकारास सामोरं जावं लागलं आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने मोबाईल मुलांच्या हाती आला. कल्पनाही नसताना आरोग्य सेतू अ‍ॅप उघडलं गेलं. यावर माहिती भरली गेली. याबाबत वडील मात्र अनभिज्ञ होते. 6 जुलै रोजी सुरुवातीला त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला आणि आरोग्य तपासणी करण्यास सांगितलं. नंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी येऊन त्यांना आरोग्य तपासणीसह विलगीकरणात राहावं लागेल असं सांगितलं. त्यानुसार त्यांनी आरोग्य तपासणी केली. अॅपवर मुलांनी चुकीने माहिती टाकल्याचं वडिलांनी सांगितलं. पण कुठलही लक्षणं किंवा आजार नसताना नाईलाजाने त्यांना विलगीकरणात राहावं लागलं.


उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा पातळीवरून माहिती मिळाली. त्यानुसार आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये ते निरोगी असल्याचं आढळलं. सोबतच घरीदेखील कुणालाही अशी आजाराची लक्षण दिसली नाही. अॅपवरील माहितीनुसार त्यांना विलगीकरणात ठेवलं. त्यांचा विलगीकरण कालावधी संपल्याचं वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोहन सुटे यांनी सांगितलं आहे.


राज्य शासनाच्या वतीने आरोग्य सेतू अ‍ॅपमध्ये कोविडविषयक माहिती दिली गेली आहे. जिल्ह्यात दीड लाखांवर लोकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केल आहेत. अ‍ॅपच्या माध्यमातून हाय रिस्कमध्ये असलेल्या 107 लोकांचं विलगीकरण करण्यात आलं होतं. आरोग्यसेतू अॅप अतिशय चांगलं आहे. नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करावं. पण, लहान मुलं चुकीची माहिती भरण्याची शक्यता असल्यानं मुलांना मोबाईल देऊ नये, असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी केलं आहे.


आता या कुटुंबाचा विलगीकरणाचा कालावधी संपला आहे. अवघं कुटुंब ठणठणीत असताना केवळ अ‍ॅपवर भरलेल्या माहितीमुळे हा मनस्ताप त्यांना सहन करावा लागला आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठीही मुलांना मोबाईल देताना काळजी घेण्याची गरज आहे.


COVID-19 in Maharashtra Raj Bhavan | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी स्वत: विलगीकरणामध्ये