मुंबई: महाविकास आघाडीत काँग्रेस विरुद्ध शिवसेना वाद रंगलाय. मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केलाय. एसआरए योजनेतील घरं रखडवणाऱ्या शिवालिक बिल्डरसोबत अनिल परब यांची मैत्री असल्याचा आरोप झिशान यांनी केला आहे. रखडलेल्या हजारो घरांच्या चाव्या अनिल परबांकडे असल्याचा गंभीर आरोप झिशान यांनी केलाय. घरं रखडवणाऱ्या शिवालिक बिल्डरला वाचवण्यासाठी दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. 


वांद्रे पूर्व विधानसभेतील कॉंग्रेस आमदार  झिशान सिद्दीकी यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून हा आरोप केला आहे.  ते म्हणाले की, "गोळीबार एसआरए स्कीममधील  घरे रखडवणाऱ्या शिवालीक डेव्हलपर सोबत मंत्री अनिल परबांची पक्की दोस्ती आहे. अनिल परबांच्या घरात , ऑफिसमध्ये रखडलेल्या हजारो घरांच्या चाव्या आहेत. एसआरए स्कीम मधील घरे रखडवणाऱ्या शिवालिक व्हेंचर्सला वाचवण्याकरता दबाव अनिल परब दबाव टाकत आहेत."


अनिल परब केवळ निवडणूकीआधी तेथील रहिवाशांना 20-25 चाव्या आणि भाड्याचे लॉलीपॉप देतात आणि राजकारण करतात असा आरोपही आमदार झिशान सिद्दीकींनी केला आहे. या विषयावर विधानसभेतही मुद्दा उपस्थित केला, पण समाधानकारक उत्तर मिळाले नाही असं आमदार सिद्दीकींनी म्हटलं आहे.


आमदार झिशान सिद्दीकी म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी विकासकाने मंत्री अनिल परबांच्या माध्यमातून 20-25 कुटुंबांना घराच्या चाव्या दिल्या. अनिल परबांचे शिवालिक डेव्हपरसोबत चांगले संबंध आहेत. उरलेल्या हजारो कुटुंबांच्या घराच्या चाव्याही अनिल परबांच्याच घरात, ऑफिसमध्ये असतील त्या शोधा."


महाविकास आघाडीच्या एका पक्षाच्या आमदाराने सरकारमधील मंत्र्यावर आरोप केल्याने शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: