Anil Parab ED Inquiry : महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा सुरुच आहे. अशातच आता शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली असून आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहणाचे आदेश देण्यात आले आहेत. पण अनिल परब चौकशीसाठी उपस्थित राहणार की, नाही? यासंदर्भातील प्रश्नचिन्ह कायम आहे. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनिल परब मुंबई आणि ठाण्यातील पोलीस दलातील बदल्या करत होतं, असं सांगितल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून 50 कोटी रुपये वसूल करण्यासाठी अनिल परब यांनी सांगितलं होतं, असा दावाही सचिन वाझे यांनी पत्र लिहून केला होता. 


ईडीची नोटीस मिळाल्यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी याप्रकरणी आपली पहिली प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, "ईडीची नोटीस मिळाली, त्यात कुठल्याही प्रकरणाचा स्पष्ट उल्लेख नाही. केवळ 31 ऑगस्ट रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहावं असं नोटीसमध्ये म्हटलं आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली होती. पुढे ते म्हणाले होते की, "नोटीसमध्ये कोणताही स्पष्ट उल्लेख नाही, त्यामुळे ही नोटीस कशा संदर्भात आहे, हे आता सांगता येणं सध्यातरी कठीण आहे. नोटीसमध्ये सविस्तर काही लिहीलं नाही. त्यामुळे कुठल्या कारणास्तव ही नोटीस दिली हे सांगता येणार नाही. केवळ चौकशीसाठी बोलावल्याचा त्यात उल्लेख आहे. यावर कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही त्याला उत्तर देऊ. ईडीची नोटीस येईल असा अंदाज होताच. आता कायदेशीर बाबींचा विचार करुन याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल." असं अनिल परब यांनी म्हटलं आहे. 


शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली होती. केंद्र सरकारनं सूडबुद्धीने ही कारवाई केलीय का असा प्रश्न संजय राऊत यांच्या ट्वीटमुळे उपस्थित होतोय.  संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, "शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. Chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू. जय महाराष्ट्र."


राष्ट्रवादीनंतर शिवसेनेच्या मागे ईडीचा ससेमिरा?


महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या मागे पुन्हा एकदा ईडीचा ससेमिरा सुरु झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी सुरु असताना शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब आणि यवतमाळच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.


खासदार भावना गवळी यांनी शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ईडीकडे तशा प्रकारची तक्रारही करण्यात आली होती. त्यानंतर आज भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीने छापा टाकत कारवाई करायला सुरुवात केली आहे. तर अनिल परब यांनाही हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्यासह अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल (सोमवारी) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्या वरती आरोप केले.


पुढचा नंबर जितेंद्र आव्हाडांचा : किरीट सोमय्या


मी गेल्या चार महिन्यांपासून याबद्दल बोलत आहे. त्यामुळे रत्नागिरीची मुद्दा पुढे करुन घोटाळेबाजांना पाठिशी घालू नका, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांना उद्देशून म्हटलं. अनिल देशमुख, आता अनिल परब आणि पुढचा नंबर राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांचा असेल, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. अनिल परब यांनी किती माया गोळा हे संजय राऊतांनी अनिल परब यांना विचारावे. आरटीओ ट्रान्सफरपासून इतर गोष्टीतून अनेक पैसे वापरले असं अनिल परब यांनी कबूल केलं असा आरोप किरीट सोमया यांनी केला आहे.