बीड : परळी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिर्णोद्धार कार्यक्रमात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय आणि तर बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी एकाच मंचावर उपस्थिती लावली. यावेळी दोघांनीही एकमेकांवर टोलेबाजी करण्याची संधी सोडली नाही. 


या प्रसंगी बोलतांना प्रीतम मुंडे म्हणाल्या की,परळीत सुरू असलेल्या विकास कामाच्या नावाखाली सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे अनेक खड्डे पडले असल्यामुळे मला आज या कार्यक्रमात येण्यास वेळ लागला असं नाव न घेता धनंजय मुंडे यांना टोला लगावला. मी एवढं दिलं, तेवढं दिलं, समाजासाठी अमुक केलं तमुक केलं अशा प्रकारचा हा कार्यक्रम नाही. हा कार्यक्रम हा धार्मिक आहे आणि परळीच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारा आहे, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या. 


यावर प्रतिउत्तर देताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, मी पाहिलेलं स्वप्न आणि तुम्ही पाहिलेलं परळीच्या विकासाचं स्वप्न लवकरच साकार होणार मात्र यासाठी मुळात पाया पक्का करावा लागतो आणि हा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागतो आहे. परळीत सुरू असलेले रस्त्याचे काम आधी पक्के करत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.


त्यांनी म्हटलं की,  मला आपल्या परळीच्या विकास कामाचा पाया पक्का करण्यासाठी वेळ लागत आहे. म्हणून प्रीतम मुंडे यांना या ठिकाणी येण्यास वेळ लागला असावा, असं मला वाटतं, असा टोलाही त्यांनी लगावला. पाया पक्का करायला फार वेळ लागतो, कळस उभा करायला वेळ लागतो. हा पाया पक्का करण्यासाठी काम सुरु आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.