Amruta Fadnavis : अमृता फडणवीस फसवणूक प्रकरणी अनिल जयसिंघानी यांना गुजरातमध्ये अटक करण्यात आली आहे. थोड्या वेळात मुंबईत दाखल होणार आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे.
मुंबई दलाच्या गुन्हे शाखेने वरिष्ठांच्या आदेशानुसार मोठी कारवाई केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून फरार असणारा अनिल जयसिंघानी याला अटक करण्यासाठी विशेष ऑपरेशन राबवण्यात आले. अनिल जयसिंघानी इंटरनेटचा वापर करून अनेकांच्या संपर्कात होता. आरोपीवर विविध राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी तांत्रिक बाबींचा आधार घेऊन ओळख लपवून राहत होता. आरोपी हा महाराष्ट्रातून शिर्डी, शिर्डीतून गुजरातच्या बरदोली येथे गेल्याच कळलं होतं. या आरोपीला पकडण्यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेतली होती. आरोपीने 72 तास गुजरातमध्ये पोलिसांना चकवा दिला होता. रात्री 11: 45 ला त्याला ताब्यात घेण्यात आलs आहे. अनिल जयसिंघानी याच्यासोबत त्याचा ड्रायव्हर आणि त्याचा एक नातेवाईक यालाही अटक करण्यात आली आहे.
अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिक्षा जयसिंघानीला देखील अटक करण्यात आली आहे. अनिक्षा ही बुकी अनिल जयसिंघानीची मुलगी आहे. फॅशन डिझायनर असल्याचं सांगत अनिक्षाने अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक साधली, पुस्तकाचे प्रकाशन केले आणि त्यानंतर वडिलांची फसवणूक झाल्याचं सांगत मदत करण्याची मागणी केली होती.
अनिल जयसिंघानीया कोण आहे?
- उल्हासनगरमधील क्रिकेट बुकी
- 2010 साली छोटा बुकी म्हणून ओळखला जायचा
- 2010 साली बेट घेताना पंचतारांकित हॉटेलमध्ये अटकेत
- ब्लू बॉय ऑफ मुंबई ओळख असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा जवळचा व्यक्ती
- जवळचा व्यक्ती मुंबई पोलीस आयुक्त झाल्यानंतर सीपी ऑफिसमध्ये वर्दळ वाढली
- 1995 साली काँग्रेसकडून उल्हासनगर पालिका निवडणूक लढवली
- 1997 ला पुन्हा काँग्रेसकडून निवडणुक लढली मात्र पराभव झाला
- 2002 साली राष्ट्रवादीत प्रवेश आणि पालिका निवडणुकीत विजयी
- मागील नऊ वर्षापासून फरार, 15 गुन्ह्यांची विविध पोलीस ठाण्यात नोंद
काय आहे प्रकरण?
एका केसमध्ये मदत करण्यासाठी डिझायनर अनिक्षा जयसिंघानी या तरुणीने अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. शिवाय त्यांना धमकी देखील देण्यात आली अशी तक्रार अमृता फडणवीस यांनी मुंबईतील (Mumbai) मलबार हिल पोलीस स्टेशनमध्ये (Malabar Hill Police Station) 20 फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर अनिक्षाविरोधात गुन्हा दाखल झाला. अनिक्षा ही गेल्या 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने अमृता यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत 1 कोटी रुपयांच्या लाचेची ऑफर अमृता फडणवीस यांना अनिक्षा आणि तिच्या वडिलांनी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.