मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ईडीने तिसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. अनिल देशमुखांना ईडीने आज (5 जुलै) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यापूर्वीच अनिल देशमुखांनी ईडीच्या समन्सविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. ईडीला आपल्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून रोखावं तसंच आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावं असं अनिल देशमुखांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे.
माझ्याविरुद्ध सुरु असलेली कारवाई कायद्याला धरुन नाही, पूर्वग्रहदूषितपणे सुरु असल्याचे मला जाणवत आहे. त्यामुळे माझ्या हिताचे रक्षण करण्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे असं अनिल देशमुखांनी म्हटलंय. देशमुखांच्या या याचिकेवर येत्या काही दिवसात सुनावणी होणार आहे.
मला जे घटनात्मक अधिकार आहेत त्याचा वापर मला करता येईल अशी अपेक्षा आहे. मी आतापर्यंत अनेक वेळा ECIR ची प्रत मागितली, कागदपत्रे मागितली पण ती मला दिली नाहीत असंही अनिल देशमुखांनी या म्हटलं आहे.
अनिल देशमुख शनिवारीच दिल्लीला गेले होते. त्यावेळी त्यांनी कायदेतज्ज्ञांची भेट घेतल्याचं स्पष्ट झालं होतं. मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटी रुपये वसुली प्रकरणात अनिल देशमुखाची ईडी चौकशी करणार आहे. या आधी ईडीने अनिल देशमुखांच्या मुंबई आणि नागपुरातील घरावर छापाही मारला होता.
या आधी ईडीने अनिल देशमुखांना दोनदा समन्स बजावलं होतं. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढतं वय ही कारणं पुढं करुन अनिल देशमुखांनी ईडीला सध्यातरी चौकशी करु नये किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून चौकशी करावी अशी विनंती केली होती. तसेच देशमुखांनी ईडीकडून 5 जुलैपर्यंतची वेळ मागितली होती. आज ही वेळ संपत आहे.
ईडीने अनिल देशमुखांना 100 कोटींच्या वसुली प्रकरणात तिसऱ्यांदा समन्स बजावलं असून आज सकाळी 11 वाजता ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिला होता.
अनिल देशमुख यांचे अटक झालेले स्वीय सचिव संजीव पलांडे यांनी ईडीला कबुली दिली आहे की पोलीसांच्या बदल्यांमध्ये खासकरुन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हात होता. परमबीर सिंह यांनी 4 मार्चला ज्ञानेश्वरी इथे झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे आरोप आपल्या तक्रारीमध्ये केला होता. ती बैठक झाल्याची कबुली देखील पलांडे यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिली आहे. पलांडे यांच्या या कबुलीमुळं अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :