मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनिल देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर आज सकाळी सीबीआयनं छापा टाकला. जवळपास साडे सहा तास अनिल देशमुख यांच्या वरळी येथील निवासस्थानाची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झाडाझडती केली. यानंतर सीबीआयची टीम सुखदा निवासस्थान येथून बाहेर पडली आहे. 12 अधिकाऱ्यांची टीम आज सकाळी साडेसातच्या सुमारास अनिल देशमुख यांच्या सुखदा निवासस्थानी पोहोचली होती. सुखदा निवासस्थानासोबतच इतर 9 ठिकाणी देखील सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी छापेमारी सुरू केली आहे. यामध्ये काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे.
Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयचा छापा
दिवसभर मुंबईत की कारवाई सुरु असताना अनिल देशमुख हे नागपुरात होते. त्यांनी दिवसभराच्या या घडामोडीनंतर मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. देशमुख म्हणाले की, सीबीआयची टीम घरी तपासणीसाठी आली होती. त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आता मी नागपुर जिल्ह्यात ज्या पद्धतीने कोरोना वाढतो आहे, या पार्श्वभूमीवर काही कोविड सेंटरला भेट देण्यासाठी काटोलला चाललो आहे, अनिल देशमुख म्हणाले.
काल दिल्लीमध्ये अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयकडून एफआयआर दाखल झाल्यानंतर आज त्यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयनं सकाळी छापा टाकला. मुंबईसह दहा ठिकाणी सीबीआयने धाड टाकली आहे. 100 कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपाप्रकरणी ही कारवाई केल्याचं समजतं. दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपूरमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने सुरुवातीला अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि आता देशमुख यांच्या घरासह मालमत्तांवर छापा टाकला.
हायकोर्टाने अनिल देशमुख यांची चौकशी होणं महत्वाचं असल्याचं म्हटलं होतं. कोर्टानं आदेशात म्हटलं होतं की, "अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर आहे. अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान अनिल देशमुखांच्या घरावरील छापेमारीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते.
परमबीर सिंह यांचा आरोप
काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या जबाबाने केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचीही चौकशी करण्यात आली होती. मग अनिल देशमुख यांचीही चौकशी झाली होती.