जालना : राज्यात कोरोनाची स्थिती जसजशी गंभीर होत आहे, तसं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आपलं अपयश झाकण्याकरता राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत असल्याची टीका केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. जालन्यात ते आज पत्रकारांशी बोलत होते.


कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, असं शास्त्रज्ञांचं मत होतं. मात्र मधल्या काळात आरोग्याच्या ज्या काही सुविधा वाढायच्या होत्या त्याकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केलं आणि आपलं अपयश झाकण्याकरता उठसूट केंद्राकडे राज्य सरकार बोट दाखवत आहे. त्यामुळे हात पाय जोडून नाही तर अमंलबजावणीकडे लक्ष द्या, असा टोला लगावत रावसाहेब दानवेंनी टीका केली आहे. त्याचबरोबर वेगवेगळी वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी समज दिली पाहिजे, असंही रावसाहेब दानवे यांनी म्हंटलं आहे. 


शिवसेना खासदार संजय राऊत यांचं  वक्तव्य हा राजकारणाचा भाग असल्याचा टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला. भाजपने दोन महिने राजकारण करू नये, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. मात्र आम्ही राजकारण करत नाही तुम्हीही करू नका, असं दानवे यांनी म्हटलं.