मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनिल देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआय छापा टाकला आहे. मुंबईसह दहा ठिकाणी सीबीआयने धाड टाकली आहे. 100 कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपाप्रकरणी ही कारवाई केल्याचं समजतं. दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपूरमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे. 


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने सुरुवातीला अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि आता देशमुख यांच्या घरासह मालमत्तांवर छापा टाकला आहे.  


दरम्यान अनिल देशमुखांच्या घरावरील छापेमारीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत


परमबीर सिंह यांचा आरोप
काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या जबाबाने केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचीही चौकशी करण्यात आली होती. मग अनिल देशमुख यांचीही चौकशी झाली होती.


हायकोर्टाने आदेशात म्हटलं होतं की, "अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर आहे. अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 


कारवाईवर सध्या टिप्पणी करणं योग्य नाही : संजय राऊत
"सीबीआय आपलं काम करेल. कायद्यासमोर कोणीही मोठी नाही. सीबीआयच्या कारवाईवर सध्या कोणतंही मत व्यक्य करणं योग्य नाही. अनिल देशमुख यांनी आपली बाजू मांडली आहे," अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सीबीआयच्या छाप्यावर व्यक्त केली.


ईडी आणि सीबीआयचा राजकीय हेतूने वापर : हसन मुश्रीफ
ईडी आणि सीबीआयचा वापर राजकीय हेतूने होत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी यांनी भाजपवर केला आहे. तसंच एका पत्रावर एवढी कारवाई होऊ शकते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील असा विश्वास आहे, असं मुश्रीफ म्हणाले. माझ्यावर देखील ईडीने कारवाई केली होती. लवकरच दूध का दूध और पानी का पानी होईल, असं मुश्रीफ यांनी म्हटलं.