मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. सीबीआयने 20 मिनिटे त्यांची चौकशी केली आणि त्यांची सुटका केली. मात्र त्यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयचा प्राथमिक चौकशी अहवाल देशमुख यांनीच लीक केल्याचा सीबीआयला संशय आहे. या प्रकरणात गौरव चतुर्वेदी आणि आनंद डागा यांचं नाव समोर आल्याचं बोललं जात आहे. काही अधिकाऱ्यांचाही यात हात असल्याचीही शक्यता आहे.


गौरव चतुर्वेदी यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केली आहे. आनंद डागा यांच्यावर संशय आहे की सरकारी अधिकाऱ्यांचा वापर करुन त्यांनी हा चौकशी अहवाल लीक केला आहे. म्हणूनच त्यांची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. तसेच राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांचीही नावंही समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांची चौकशी सीबीआयकडून होण्याची शक्यता आहे. 


गौरव चतुर्वेदी यांचं अपहरण झाल्याचा आरोप


गौरव चतुर्वेदी यांना अचानक काहीही पूर्वसूचना देता सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला होता. गौरव चतुर्वेदी यांचं 10 जणांनी अपहरण केल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला होता. वरळीतील निवासस्थानाखाली त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांनी केला होता. याप्रकरणी देशमुख कुटुंबियांनी वरळी पोलीस स्टेशनमध्येही धाव घेतली होती. 


अनिल देशमुख यांना 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयने क्लीनचिट दिली आहे आणि सीबीआयने प्राथमिक तपासानंतर ही क्लीनचिट दिली असा अहवाला काही दिवसांपूर्वी लीक झाला होता. एक पीडीएफ फाईल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे असं सीबीआयने स्पष्ट केलं. मात्र व्हायरल झालेल्या पीडीएफ फाईलबाबत सीबीआयने कोणताही स्पष्ट उल्लेख केला नव्हता. 



संबंधित बातम्या